मुंबई : लालबागच्या राजाच्या भक्तांसाठी आनंदाची आणि मोठी बातमी आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवातलालबागचा राजाही विराजमान होणार आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय झाला असून कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करूनच यंदा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गत वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा विराजमान झाला नव्हता.
गणेश भक्तांच्या विनंतीवरून यावर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा गणेशोत्सव राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच साजरा केला जाईल. असेही मंडळाने जाहीर केले आहे. तसेच, गणेश मूर्तींच्या उंचीसंदर्भात सरकारने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे, यावेळी लालबागच्या राजाची मूर्ती केवळ चार फुटांचीच असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे आता अनेक भक्तांना गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेता येणार आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेणेशोत्सवाऐवजी ‘आरोग्य उत्सव’ साजरा केला होता. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गेणेशोत्सव मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले होते. याशिवाय अनेक मंडळांनीही गेल्या वर्षी आरोग्य विषयक उपक्रम राबवले होते.
कणेशोत्सव म्हटले की भक्तांची सर्वत्र मोठी गर्दी होत असते. विशेत: लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठीही भक्त मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. मात्र, यावेळी कोरोना परिस्थिती लक्षात घेत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केल्याचे समजते. या मंडळाच्या वतीने १९३४ पासून गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, गेल्यावर्षी कोरोनाच्या उद्रेकामुळे ८६ वर्षांनंतर पहिल्यांदाच मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला नव्हता. मात्र, यावर्षी लालबागच्या राजाचा दरबार पुन्हा एकदा सजलेला दिसणार आहे.