Top Newsराजकारण

धुळीच्या वादळाने मुंबईकरांचा श्वास कोंडला; उत्तर कोकण, ठाणे आणि पालघरलाही धोका

मुंबई : पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रामार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे येत्या १२ तासांमध्ये उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी धुळीचे वारे ताशी २० ते ३० किमी वेगानं येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.

धुळीच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी दृश्यमानता कमी होण्याचीही शक्यता आहे. हवेतील धुलीकणांचं प्रमाण वाढल्यानं मुंबईत लोकल ट्रेन आणि उंच इमारती काहीशा अंधुक दिसत असल्याचेही फोटो समोर आले आहेत. तसंच मुंबईत आज सकाळपासूनच हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

मुंबईत इमारती, लोकल दिसेनाशी

हवेत धुलीकणांचं प्रमाण वाढल्याचा परिणाम मुंबईत काही ठिकाणी दिसून आला आहे. मुंबईतील उंचच उंच इमारती धुळीच्या वाऱ्यामुळे दिसेनाशा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.

मुंबईत १० वर्षांतील नीचांकी कमाल तापमानाची नोंद

धुळीच्या वादळाने मुंबईकरांचा श्वास कोंडला असतानाच दुसरीकडे मुंबईच्या कमाल तापमानाने मुंबईकरांना हुडहुडी भरविली आहे. कारण रविवारी मुंबईचे कमाल तापमान २३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, गेल्या दहा वर्षांतील हे नीचांकी कमाल तापमान आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. दरम्यान, धूळीचे वादळ, पाऊस असे बदलते हवामान यास कारणीभूत असून, हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी व कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button