
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने नऊ प्रभागांची संख्या वाढविल्याने मुंबई महापालिकेने २३६ प्रभागांचे सीमांकान करून सुधारित मसुदा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. यावर निवडणूक आयोगाने हरकती व सूचना मागविण्यास पालिका प्रशासनाला सुचित केले आहे. त्यानुसार यादी प्रसिद्ध करून प्रभाग रचनेबाबत हरकती व मागविल्या जाणार आहेत.
मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग आहेत, मात्र मागील काही वर्षांमध्ये उपनगरांत लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने ९ प्रभाग वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २३६ प्रभागांचा सुधारित आराखडा तयार राज्य निवडणूक आयोगाकडे गेल्या आठवड्यात सादर करण्यात आला होता. हा आराखडा मंजूर करीत राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना २३६ प्रभागांच्या सीमा आणि जनतेकडून हरकती व सूचना मागवण्याची सूचना केली आहे.
त्यानुसार १ फेब्रुवारी रोजी याबाबतची अधिसूचना काढून यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याच दिवशी संकेतस्थळावर २३६ प्रभागांची यादी प्रसिद्ध करून जनतेकडून हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. १ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत मागविलेल्या हरकती व सूचना १६ फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक विभागाला सादर केल्या जाणार आहेत. त्यानंतर २६ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सुचनांवर अंतिम सुनावणी होईल. तसेच २ मार्च रोजी शिफारशीसह विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला सादर करावे, असे सूचित करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने मागवल्या हरकती आणि सूचना
निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्डाच्या हद्दी ठरवण्यात येणार आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून एक परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. निवडणुकांचे कामकाज विहीत कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रभागांच्या हद्दी निश्चित करण्याचा टप्पा महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी प्रभागाच्या भौगोलिक सीमाांची निश्चिती केली जाणार आहे. भौगोलिक सीमांची निश्चिती केल्यानंतर, त्यावर जर कोणाची सूचना किंवा हरकत असेल तर ती मागवण्यात येईल. त्यानंतर प्राप्त हरकतीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने या पत्रात दिली आहे. तसेच निवडणुकीच्या संदर्भांतील विविध टप्प्यावरील माहिती महापालिकेने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी असे देखील आयोगाने म्हटले आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, निवडणुकीच्या अनुषंगाने विविध कामांना सुरुवात झाली आहे. मात्र आरक्षणाच्या सोडतीपूर्वी भौगोलिक सीमांची निश्चिती होणे आवश्यक असते. त्यामुळे आता वार्डाच्या हद्दी ठरवण्यात येणार आहेत. त्यावरील हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. सर्व कामे ही ठरलेल्या वेळेत आणि नियोजनानुसारच पूर्ण होतील. या सर्वांची जबाबदारी ही महापालिका आयुक्तांची असणार आहे.
दरम्यान केवळ वॉर्डाच्या हद्दी ठरवणेच नाही तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतर महत्त्वाची कामे देखील ठरलेल्या वेळेतच पूर्ण व्हावीत. निवडणुकांसर्भातील सर्व कामांची माहिती महापालिकेने आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी अशा सूचना देखील राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या आहेत. तसेच निवडणुकी संर्भातील कामे वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांची असणार आहेत.