महापालिका निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची नवीन कार्यकारणी जाहीर झाली आहे. या कार्यकारिणीत सहा ज्येष्ठ उपाध्यक्ष, १५ उपाध्यक्ष, ४२ महासचिव, ७६ सचिव आणि ३० कार्यकारी सदस्य आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील सर्वच गटांना काही ना काही मिळेल, याची दक्षता या निमित्ताने घेतली गेल्याचं चित्र आहे. आमदार भाई जगताप यांची डिसेंबरमध्ये मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबत चरणसिंग सप्रा यांना कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले गेले. आता नव्या अध्यक्षांच्या कार्यकारिणीची दिल्लीतून घोषणा झाली आहे.
मुंबई काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत ६ ज्येष्ठ उपाध्यक्ष, १५ उपाध्यक्ष, ४२ महासचिव, ७६ सचिव आणि ३० कार्यकारी सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात जरी काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असली तरी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सामूहिक नेतृत्व सोपवत सर्व गटांना खुश करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. राज्य पातळीवर देखील असंच काँग्रेसने केलं आहे.
मुंबई काँग्रेस कार्यकारिणी
ज्येष्ठ उपाध्यक्ष – मधू चव्हाण, बाबा सिद्दीकी, वीरेंद्र बक्षी, जेनेट डिसुझा, गणेश यादवी, शिवजी सिंह
उपाध्यक्ष – अशोक सुतराळे, नगमा मोरारजी, युसुफ अब्राहनी, दिनेश हेगडे, जॉर्ज अब्राहम, मोहम्मद शरीफ खान, जयप्रकाश सिंह, मोहसीन हैदर, वीरेंद्र उपाध्याय, धर्मेश व्यास, अर्जुन सिंह, गोविंद सिंह, जुनैद पटेल, प्रवीण नाईक, प्रणिल नायर