भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांच्या मागावर नाशिक पोलीस; तर संजय राऊतांनी घेतली आयुक्तांची भेट
नाशिक : भाजपचं कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांचा नाशिक पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांची शोधाशोध सुरू असतानाच शिवसेना नेते संजय राऊत नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
भाजप कार्यालय फोडणारे शिवसैनिक काल संजय राऊत यांच्या सोबत असल्याने भाजप पदाधिकारी आक्रमक झाले होते. भाजप कार्यलय फोडणारे दीपक दातीर, बाळा दराडे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांच पथक रवानाही झालं होतं. मात्र, या संपूर्ण पार्श्वभूमीवर राऊत दीपक पांडे यांच्या भेटीला आल्याने चर्चेला उधाण आलं. या भेटीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पांडे चांगले अधिकारी आहेत. मला अशा अधिकाऱ्यांना भेटणे आवडते. ते कायद्याशी तडजोड करत नाहीत असा माझा अनुभव आहे, असं राऊत या भेटीनंतर म्हणाले.
भाजपच्या कार्यालयावर हल्ला करणारे काही शिवसैनिक काल मुंबईत आले होते. या शिवसैनिकांनी राऊत यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर आज राऊत नाशिकमध्ये आले असून त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. पदाधिकाऱ्यांना संबोधित केल्यानंतर राऊत पांडे यांच्या भेटीसाठी गेले होते.
राणेंचं मनस्वास्थ बिघडलंय
नारायण राणे केंद्राचे मंत्री आहेत. त्यांची प्रकृती बरी नसते. अटकेचा प्रसंग आला तेव्हा ते आजारी पडतात. त्यांचं मनस्वस्थ बिघडलं आहे. त्यांनी विपश्यना करावी. त्यांच्या मुलाने त्यांना त्रास देऊ नये, असा चिमटा राऊत यांनी काढला. उद्यापासून लाखो शिवसैनिक राणेंच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करणार आहेत. भाजपने देखील प्रार्थना करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांच्या भेटीवरही भाष्य केलं. नाशिकचे पोलीस आयुक्तांना मी आज ओळखत नाही. आमचं कौटुंबिक नात आहे. ते प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकारी आहेत. अशा अधिकाऱ्यांना भेटणं मला आवडतं, असं त्यांनी सांगितलं. मी देखील खासदार आहे. मला कायद्याचा अभ्यास आहे. मी कायदा तोडत नाही. मी त्या दोघांना पोलिसांसमोर हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
एका व्यक्तीमुळे नातं बिघडलं
एकमेकांच्या कार्यालयावर हल्ला करणे उद्धव ठाकरे आणि आम्हाला आवडत नाही. भाजपच आणि आमचं नातं 25 वर्षाचं आहे. मात्र एका व्यक्तीमुळे हे नात बिघडलं. राणे जे बोलताय ते फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार बोलू शकत नाही म्हणून त्यांनी राणेंना बोलायला पुढे केलं, असा आरोपही त्यांनी केला.