मुंबई :राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. सर्वाधिक ३८४ जागा मिळवून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजप खालोखाल राष्ट्रवादीला ३४४ जागा मिळाल्या आहेत. राज्यात आघाडी सरकारचे नेतृत्व करणार्या शिवसेनेला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसून २८४ जागा जिंकत हा पक्ष चौथ्या स्थानी फेकला गेला आहे. तर ३१६ जागा जिंकत काँग्रेस पक्ष तिसर्या क्रमांकावर राहिला आहे.
राज्यातील १०६ नगर पंचायतींमधील १ हजार ८०२ जागांसाठी २१ डिसेंबर २०२१ आणि १८ जानेवारी २०२२ अशा दोन टप्प्यात मतदान झाले होते. यापैकी बुधवारी ९७ नगर पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन १ हजार ६४९ जागांपैकी १ हजार ६३८ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले.
ही निवडणूक चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी आघाडी होती. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी घोषित केलेल्या निकालानुसार भाजपला सार्वधिक जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सरशी झाली आहे.
राज्यात २०१७ च्या तुलनेत या वर्षीच्या निवडणुकीत भाजपला तब्बल सात नगरपालिकेचा तोटा झाला, तर तब्बल राष्टवादीला १३ अधिक नगरपंचायतीवर सत्ता मिळाली आहे. महाराष्ट्रात भाजपला २०१७ मध्ये ३१ नगर पंचायती मिळाल्या होत्या, तर आजच्या निकालानंतर त्यांना ७ जागांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी त्यांना २४ नगर पंचायती मिळाल्या आहेत.
राष्ट्रवादीला २०१७ मध्ये १३ नगर पंचायती मिळाल्या होत्या, तर आजच्या निकालानंतर त्यांना १३ जागांचा फायदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी त्यांना २६ नगर पंचायती मिळाल्या आहेत.
काँग्रेसला २०१७ मध्ये २४ नगर पंचायती मिळाल्या होत्या, तर आजच्या निकालानंतर त्यांना ६ जागांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी त्यांना १८ नगर पंचायती मिळाल्या आहेत.
शिवसेनेला २०१७ मध्ये ११ नगर पंचायती मिळाल्या होत्या, तर आजच्या निकालानंतर त्यांना ३ जागांचा फायदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी त्यांना १४ नगर पंचायती मिळाल्या आहेत.
शिवसेना 11 14 3 फायदा
कुडाळमध्ये नारायण राणेंना, तर देवगडमध्ये नितेश राणेंना मोठा धक्का
तळकोकणात चार नगरपंचायत या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सिंधुदुर्गात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील चार पैकी दोन नगरपंचायतींमध्ये शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसने नारायण राणे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. गेल्या निवडणुकीत एक उमेदवार असलेल्या देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने यंदा आठ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. भाजपनेही आठ जागांवर विजय मिळवला असला तरी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे देवगड नगरपंचायतीवर त्यांची सत्ता येईल.
कुडाळ नगरपंचायतीमध्येही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सहजपणे सरशी होणार असे वाटत असतानाच अवघ्या एका जागेने घोळ घातला आहे. कुडाळ नगरपंचायतमध्ये शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस यांना काँग्रेसने पाठिंबा दिला तर महाविकास आघाडीच्या ताब्यात जाऊ शकते. कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपने आठ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेनेला सात आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसने मदतीचा हात पुढे केल्यास याठिकाणीही भाजपची सत्ता येऊ शकते किंवा आघाडीची सत्ता येणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील चारही नगरपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढली. त्यामुळे आता कुडाळ नगरपंचायत मध्ये काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत आहे.
सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. याठिकाणी शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालया समोरून वैभव नाईक यांची विजयी मिरवणूक जात असताना शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
वाभवे वैभवववाडी नगरपंचायतची सत्ता भाजपने राखली आहे. आमदार नितेश राणेंनी याठिकाणी आपली सत्ता राखली आहे. वैभववाडी नगरपंचायतीमध्ये भाजपला नऊ, शिवसेना पाच आणि अपक्ष उमेदवारांनी तीन जागांवर विजय मिळवला.
कसई दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये आमदार दीपक केसरकर यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला. दीपक केसरकरांच्या ताब्यात असलेली कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची सत्ता शिवसेना भाजप युतीकडे होती. मात्र आताच्या निवडणुकीत भाजपने १२, शिवसेना २, तर राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि अपक्ष २ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे दीपक केसारकरांना धक्का देत भाजपने कसई दोडामार्ग नगरपंचायत खेचून आणली.
जिल्ह्यातील चारही नगरपंचायत निवडणुकीत भाजपने आपलं वर्चस्व असल्याचा दावा करत आहेत. चारही नगरपंचायत आपल्याकडे असतील असा दावा भाजप कडून करण्यात येत आहे. तर शिवसेनेकडून आपल्या ताब्यात दोन नगर पंचायत असल्याचा दावा करत आहेत.
रोहित पाटलांची दमदार कामगिरी
नगर पंचायतीच्या निवडणूक निकालात सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ नगर पंचायतीनं. कारण या निवडणुकीच्या निमित्ताने माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मुलाचं राजकीय कौशल्य पणाला लागलं होतं. एकीकडे सर्वच पक्ष आबांचा मुलगा रोहित पाटील याच्याविरोधात गेले होते. पण या पठ्ठ्याने हार मानली नाही.
कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानं रोहित पाटील यांनी राजकारणात दमदार प्रवेश केला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला अभूतपूर्व विजय मिळाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी पॅनेलनं १०, शेतकरी विकास पॅनेलनं ६ तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. या निवडणुकीत लागलेल्या निकालानंतर सर्वच स्तरातून रोहित पाटील यांचे कौतुक होत आहे.
आबांची आठवण मनात दाटून येतेय !
विजयानंतर खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढते, कवठेमहांकाळ आणि परिसराच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत, असं रोहित पाटील यांनी विजयानंतर म्हटलं आहे. तसेच, सर्वच नागरिकांचे आभार मानत आज स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येत आहे. आबांनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, सहकारी यांनी जी रात्रंदिवस मेहनत घेतली, सुमनताईंच्या अनुपस्थितीत माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आपण विश्वास दाखवला. कवठेमहांकाळातील सुजाण नागरिक, कार्यकर्ते मित्र, सहकारी, पत्रकार, राज्यभरातील हितचिंतक ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या निवडणुकीत मोलाची मदत केली त्या प्रत्येकांचा हा विजय आहे असंही रोहित पाटील म्हणाले.
तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी निकालात भाजपच नंबर १ !
राज्यात महाविकास आघाडीने भाजपचा धुव्वा उडवला आहे. परंतु महाविकास आघाडी आणि भाजपा या चारही पक्षांची कामगिरी पाहिली तर राज्यात भाजप नंबर एक पक्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. २०१७ च्या निवडणुकीपेक्षा २०२२ मध्ये भाजपाने जास्त जागा जिंकल्याची आकडेवारी समोर आली आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलंय की, २०१७ चा निवडणूक निकाल व आताचा निवडणूक निकाल पाहता राज्यात भाजपा क्रमांक १ चा पक्ष आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढले तरी महाराष्ट्रातील जनता भाजपासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उपाध्ये यांनी २०१७ आणि २०२२ च्या निवडणूक निकालाचे आकडे पोस्ट केले आहेत.
त्यात भाजपाला २०१७ मध्ये ३४४ जागा मिळाल्या होत्या तर यंदाच्या निकालात ४१७ जागा पटकावल्या आहेत. शिवसेनेने २०१७ मध्ये २०१ जागा जिंकल्या होत्या. त्यातही वाढ होऊन हा आकडा २९० इतका झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं २०१७ च्या निवडणुकीत ३३० जागा जिंकल्या होत्या त्यांना यंदाच्या निकालात ३६९ जागा मिळाल्या आहेत. यात मागील निवडणुकीच्या निकालाची तुलना केल्यास काँग्रेसला जबर फटका बसल्याचं दिसून येते. काँग्रेसला २०१७ च्या निकालात ४२६ जागा मिळाल्या होत्या तो आकडा २९९ पर्यंत खाली घसरला आहे.
राष्ट्रवादीचा देवेंद्र फडणवीसांना टोला
राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले असून हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे त्यामुळे हा पक्ष दोन-तीन जिल्ह्यापुरता मर्यादित आहे असं बोलणाऱ्यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी चपराक लगावली आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा करुन तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रमे हाती घेतली होती. जनता दरबार उपक्रमातून जनतेची कामेही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला होता त्याचाही फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला आहे. या निकालांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलणाऱ्यांना चांगलीच चपराक लागली आहे असं त्यांनी म्हटलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत मतदान केल्याबद्दल राज्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.
नगरपंचायत निवडणुकीचे निकाल काँग्रेससाठी समाधानकारक : नाना पटोले
राज्यात नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी सुधारली आहे. विदर्भात काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे तर कोकणात पक्षाने खाते खोलले आहे. आजचा निकाला पाहता आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नगर पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निकालावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाने राज्यातील जनतेने आपला कौल महाविकास आघाडीच्या बाजून दिला असून भारतीय जनता पक्षाला नाकारले आहे. भारतीय जनता पक्षाने मागील वेळी ६०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या त्या आता ३०० वर खाली घसरल्या आहेत. आम्ही १७ नगरपंचायतीवरून २२ वर गेलो आहोत. काँग्रेस पक्षाने ३०० हून अधिक जागा जिंकल्या असून काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाड्यांनी ही चांगले यश मिळवले आहे. भाजपचे १०५ आमदार आहेत व आमचे ४४ आहेत तरीही काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे.
देशाचा व राज्याचा विकास करून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याने जनतेने आमच्यावर विश्वास टाकला असून आम्ही त्यांचा विश्वास सार्थ ठरवू. भंडा-याचा निकाल अजून येत आहे, तिथेही काँग्रेसच क्रमांक एकचा पक्ष राहील आणि सत्ता स्थापन करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तो योग्य होता हे जनतेने आजच्या निकालातून दाखवून दिले आहे.
भारतीय जनता पक्ष व चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतना नाना पटोले म्हणाले की, भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे त्यांचा दावाच हास्यास्पद आहे. मिस कॉल करून फसवून एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा करणारा भाजपा जगातील पहिला पक्ष आहे. जनता त्यांचा भूलथापांना बळी पडत नाही हेच नगरपंचायतीच्या निकालावरुन दिसून आले आहे.
२६ महिन्यांपासून सत्तेबाहेर तरीही आम्हीच नंबर वन; चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला डिवचले
आम्ही २६ महिन्यांपासून सत्तेच्या बाहेर आहोत. पण आज झालेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरून सत्ताधारी नव्हे तर आम्हीच राज्यात नंबर वन आहोत हे सिद्ध झालं आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेनेला चांगलेच चिमटे काढले. राज्यातील नगरपालिका – नगरपंचायती तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळविल्या असून पुन्हा एकदा ‘भाजपाच नंबर वन’ हे सिद्ध झाले आहे, असं पाटील यांनी सांगितलं. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी आणि सुनील कर्जतकर उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरविल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मतदारांचे आभार मानले आणि पक्षाच्या गावोगावच्या नेते – कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. भाजपाला या निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. स्वबळावर किंवा काही मदत घेऊन ३४ नगरपालिका – नगरपंचायतींमध्ये भाजपची सत्ता असेल. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असेल तर भंडारा जिल्हा परिषदेत मदत घेऊन भाजप सत्तेवर येईल, असं त्यांनी सांगितलं.
गेले २६ महिने भाजपा राज्यात सत्तेबाहेर आहे तरीही पक्षाचे संघटन मजबूत आहे. भाजपाच्या नेते – कार्यकर्त्यांची एकजूट आहे. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत यश मिळाले आहे. सत्ताधारी आघाडीमध्ये बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नाही. कोरोनाचा सामना करणे आणि राज्यात विकासकामे करण्यापेक्षा आघाडीचे नेते कमाईमध्ये गुंतले आहेत. जनता या प्रकाराला कंटाळली आहे. जनतेची नाराजी नगरपालिका – नगर पंचायतींच्या निकालात दिसली, असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्रीपद असूनही शिवसेना चौथ्या नंबर वर कशी?
राज्यातील नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल हाती आले आहेत. भाजपने सर्वाधिक नगर पंचायती जिंकतानाच नगरपंचायतीतील सदस्य संख्येतही भाजप नंबर वन ठरला आहे. विशेष म्हणजे गेल्या राज्याचं मुख्यमंत्रीपद आपल्याकडे असूनही शिवसेनेला आपला दबदबा निर्माण करता आलेला नाही. विदर्भात तर शिवसेनेला काही ठिकाणी खातेही खोलता आले नाही. त्यामुळे शिवसेना हळूहळू अंकूचन पावतेय का? भाजपला आगामी काळात राज्यात संधी आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
अजितदादा म्हणतात, रोहित पाटील जमिनीवरचा नेता !
सर्व पक्ष एकीकडे आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील एका बाजूला असं चित्रं कवठेमहाकाळ नगरपंचायतीत होतं. तरीही रोहित पाटील यांनी ही नगरपंचायत खेचून आणली आहे. रोहित यांच्या या दणदणीत विजयावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आरआर आबांचं ब्लड रोहितमध्ये आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. काही निवडणुकांचे निकाल पाहता साधारण ज्या भागात तरुण नेतृत्व आहे त्यावर लोक विश्वास टाकतात. कर्जत-जामखेडला मागच्या पाच वर्षात आमचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. उमेदवारही मिळत नव्हता. तिथे रोहित पवारांनी क्लिअर मेजॉरिटी आणली आहे. कवठेमहाकाळमध्ये सगळे एकीकडे आणि रोहित एकीकडे होता. रोहित विरुद्ध सर्व अशी लढाई होती. रोहितचं वक्तृत्व चांगलं आहे. त्याची कामाची पद्धत चांगली आहे. जमिनीवरचा नेता आहे. लोकांशी मिसळून वागतो. आर आर पाटलांचं ब्लड त्याच्यात आहे. मनमिळावू स्वभाव आहे. त्यामुळे त्याच्यावर लोकांनी विश्वास टाकला. आता त्याने विकासकामे करावीत. त्याच्या प्रत्येक कामात आम्ही त्याला सहकार्य करू, असं अजित पवार म्हणाले.
एकूण नगरपंचायत निवडणूक निकालावरही अजित पवारांनी भाष्य केलं. आघाडी म्हणून पॅनेल करून नगरपंचायतीत लढलो नव्हतो. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करण्याबाबतचा अधिकार जिल्हास्तरावर दिला होता. प्रत्येकाने जिल्हास्तरावर शिवसेना आणि काँग्रेसने मुभा दिली होती. तुम्ही दोघे एकत्र येऊन समोरच्याचा पराभव करू शकता तर दोघं एकत्रं या, तिघं पराभव करू शकत असाल तर तिघे एकत्रं या, स्वतंत्र लढून जास्त जागा निवडून येत असेल तर स्वतंत्र लढा अशा सर्व प्रकारच्या मुभा दिल्या होत्या. त्यामुळे असंच लढलं पाहिजे, अशीच आघाडी केली पाहिजे अशी बंधनं घातली नव्हती, असं सांगतानाच उद्या कॅबिनेट आहे. त्यात निकालाचा आढावा घेऊ. आघाडीला फटका बसणार नाही यासाठी काय केलं पाहिजे यावर चर्चा करू, असंही ते म्हणाले.
एखाद्या निवडणुकीवर तीन पक्ष मिळून जेव्हा चर्चा करतो तेव्हा काही पक्षांकडून जागांची अवास्तव मागणी होते. एखादा पक्ष एखाद्या ठिकाणी कमकुवत असतो तरी तो अधिक जागा मागतो. तिन्ही पक्षांनी त्यासाठी समंजस भूमिका घेऊन ज्या पक्षाची अधिक ताकद असेल त्या ठिकाणी त्या पक्षाला जास्त जागा दिल्या पाहिजे. कमकुवत पक्षांना कमी जागा दिल्या पाहिजे. काही ठिकाणी राष्ट्रवादी, तर काही ठिकाणी काँग्रेस आणि काही ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे. त्यानुसार जागा वाटपावर तोडगा निघाला पाहिजे, तिन्ही पक्षांनी दोन पावलं मागे सरकून भूमिका घेतली तर त्यातून मार्ग निघू शकतो, असंही ते म्हणाले.