राजकारण

‘जय श्री राम’ म्हणणारे राक्षस; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

संभल : काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन वाद सुरू आहे. यातच आता काँग्रेसचे आणखी एक नेते रशीद अल्वी यांच्या वक्तव्यावरुन नवीन वादाला तोंड फुटले आहे. अल्वी उत्तर प्रदेशातील संभल येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी श्रीरामाच्या नावावरुन भाजपवर निशाणा साधला. रामायणाचा एक प्रसंग सांगताना त्यांनी ‘जय श्री राम’ म्हणणाऱ्यांची तुलना राक्षसाशी केली. अल्वी म्हणाले, ‘जय श्री रामचा जप करणारे सर्व ऋषी नाहीत, ते राक्षस आहेत. आपल्याला सावध राहण्याची गरज आहे.’

आपल्या भाषणादरम्यान रशीद अल्वींनी भाजपच्या काही लोकांकडे बोट दाखवत जय श्री रामचा नारा देणाऱ्यांची तुलना रामायणातील कालनेमी राक्षसाशी केली. ते म्हणाले की, लक्ष्मण जेव्हा बेशुद्ध पडले होते, तेव्हा वैद्याच्या सांगण्यावरुन हनुमान हिमालयातून संजीवनी औषध आणण्यासाठी जात होते. त्यावेळी जमीनीवरुन राक्षस जय श्री रामचा जयघोष देत होते. हे ऐकून हनुमानजी खाली आले. हनुमानाचा मौल्यवान वेळ वाया घालवण्यासाठी त्या राक्षसाने हनुमानाला स्नान करायला पाठवले होते. त्या राक्षसाप्रमाणे काही लोक आजही भगवान श्रीरामाचे नामस्मरण करत आहेत, असे रशीद म्हणाले. रशीद पुढे म्हणाले की, आम्हालाही देशात रामराज्य हवे आहे, पण ज्या राज्यात बकरी आणि सिंह एकाच घाटावर पाणी पितात, तेथे द्वेष कसा असू शकतो ? जय श्री रामचा जयघोष करुन लोकांची दिशाभूल करणाऱ्यांपासून इतरांनी सावध राहावे.

अल्वी यांच्या या वक्तव्यावर भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी अल्वी यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर केला असून सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता रशीद अल्वी जय श्री राम म्हणणाऱ्यांना निशाचर(राक्षस) म्हणत आहेत, असे मालविया म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button