Top Newsराजकारण

मोदी-शाह यांचे पुन्हा धक्कातंत्र; भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानं पुढील मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर भाजपच्या विधिमंडळ आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांना विधिमंडळ नेते म्हणून निवडण्यात आलं आहे. त्यामुळे भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. भूपेंद्र पटेल यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याने त्यांच्या निवडीत मोदी-शाह यांनी पुन्हा धक्कातंत्र अवलंबिल्याचे दिसून येते.

रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू झाली होती. नितीन पटेल, मनसुख मांडविया, आर. सी. पाटील आणि पुरुषोत्तम रुपाला यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती. या दिग्गज नेत्यांपैकी एकाला मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली जातील अशी चर्चा होती. मात्र, भाजपने पुन्हा एकदा नवा चेहरा देऊन सर्वांना धक्का दिला आहे. उत्तराखंडमध्येही भाजपने असंच धक्कातंत्र वापरलं होतं. तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने पुष्करसिंह धामी या नव्या चेहऱ्याला संधी देऊन सर्वांना कोड्यात टाकलं होतं. तेच गुजरातमध्ये घडलं.

भूपेंद्र पटेल हे गुजरात भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा जवळपास १ लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता. विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाबद्दल गुजरातमधील पटेल समाजात नाराजी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपाला विजय मिळणे शक्य नाही, हे स्पष्ट दिसत होते. तसेच, त्यांना गुजरातमधील कोरोना स्थिती नीट हाताळ‌ता आली नाही. या तीन महत्वाच्या कारणांमुळे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून विजय रुपाणी यांना हटविण्यात आले, अशी चर्चा आहे. सूत्रांनुसार अमित शाह हे दोन दिवसांपूर्वी अचानक रात्रीच्या सुमारास गुजरातला आले होते. यानंतर लगेचच सकाळी दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली, यामध्येच रुपाणी यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला.

दिल्लीत स्क्रिप्ट लिहिली, अहमदाबादेत वाचन?

पहिल्यांदाच आमदार झालेले असताना आणि संसदीय कामकाजाचा फारसा अनुभव नसतानाही पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल यांच्याकडे असलेला निगर्वीपणा, इतर नेत्यांना असलेली मुख्यमंत्रीपदाची आस, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका, जातीय समीकरणे आदी कारणांमुळे पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडल्याचं सांगितलं जातं.

भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. ते पाटीदार समाजाचे नेते आहेत. त्यांचं पाटीदार समाजावर वर्चस्व आहे. पटेल हे ५९ वर्षाचे आहेत. ते अहमदाबादच्या शिलाज येथील रहिवासी आहेत. त्यांनी सिव्हील इंजीनियरिंगचा डिप्लोमा केला आहे. ते व्यवसायाने बिल्डर आहेत. विशेष म्हणजे ते पहिल्यांदाच आमदार झाले असून त्यांनी कधीही मंत्रीपद भूषविलेले नाही.

स्थायी समिती अध्यक्ष ते मुख्यमंत्री

भूपेंद्र पटेल हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. सामाजिक आणि राजकीय चळवळीत त्यांचा सहभाग राहिला आहे. १९९९-२००० मध्ये ते मेमनगर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २०१० ते २०१५ पर्यंत ते थलतेज वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २०१५-१७ मध्ये ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. तसेच २००८-१० मध्ये ते एएमसी स्कूल बोर्डाचे उपाध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर साडे तीन वर्षानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ते पटेल संघटनांच्या सरदार धाम आणि विश्व उमिया फाऊंडेशनचे ट्रस्टीही आहेत. त्यांना मुख्यमंत्री केल्याने ते पाटीदार समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठी भूमिका निभावू शकतात. ते घटलोडिया विधानसभा मतदारसंघातून १ लाख १७ हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांची संघटनेवर आणि मतदारसंघावर चांगली पकड आहे. मतदारसंघातील लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना मतदारसंघात ‘दादा’ म्हणून ओळखले जाते.

भूपेंद्र पटेल ज्या घटलोडिया मतदारसंघातील आमदार आहेत, त्या मतदारसंघातून या पूर्वी माजी मुख्यमंत्री आणि यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल निवडणूक लढवायच्या. आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अत्यंत खास म्हणूनही ते ओळखले जातात.

भाजपने आज सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्यात नव्या नेत्याच्या नावावर चर्चा करण्यात आली. पर्यवेक्षकांनी या सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. विजय रुपाणी यांचंही मत जाणून घेण्यात आलं. मात्र, ही चर्चा केवळ औपचारिक होती. दिल्लीतून मुख्यमंत्रीपदाचं नाव ठरलं होतं. दिल्लीत स्क्रिप्ट लिहिली गेली. अहमदाबादेत ती वाचून दाखवण्यात आली.

गुजरात विधानसभा निवडणुकीला अवघे १५ महिने बाकी आहेत. पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. गुजरात हा नेहमीच भाजपचा गड राहिला आहे. त्यामुळे हा गड राखणे हे भाजप समोरचं आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला पाटीदार आंदोलन आणि काँग्रेसशी झुंज द्यावी लागली होती. यावेळी निवडणूक सोपी व्हावी, अधिक आव्हाने राहू नयेत म्हणून राज्याच्या प्रमुखपदी पटेल समाजातील नेता असणं महत्त्वाचं होतं. त्यामुळेच भाजपने भूपेंद्र पटेल यांना मैदानात उतरवलं आहे. पाटीदार समाजाला आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा हा एक प्रकार आहे, असं सांगण्यात येतं.

लवकरच मंत्रिमंडळातही मोठे बदल होण्याची शक्यता

मुख्यमंत्री बदलण्यात आल्यानंतर आता भाजप नेतृत्त्वाकडून गुजरात सरकारमध्ये आणखी बदल अपेक्षित आहेत. सुत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या वृत्तानुसार मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अनेक विद्यमान मंत्र्यांना नारळ मिळणार आहे. तर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. रुपाणी यांचा चेहरा घेऊन भाजपनं आगामी विधानसभा निवडणूक लढवल्यास पक्ष पराभूत होण्याचा अंदाज होईल अशी शक्यता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली होती. त्यामुळेच रुपाणी यांना हटवण्यात आल्याचं समजतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button