
मुंबई : केंद्रातील मोदी सरकार देशातील युवा पिढीला ड्रग्जच्या नशेच्या आधीन करत असून, दुसरीकडे धर्माचे राजकारण करत भांडणे लावण्याचे काम करत आहे, असा मोठा आरोप गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केला आहे.
मुंबई काँग्रेसच्या गुजराती सेलच्या विशेष संमेलनाचे आयोजन नुकतेच मुंबईत करण्यात आले होते. आगामी मुंबई महापालिका व विधानसभा निवडणुकीत गुजराती समाजाला काँग्रेसच्या विचारधारेशी जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे हार्दिक पटेल यांनी यावेळी सांगितले. व्हायब्रंड गुजरातच्या नावाखाली भाजप सरकारतर्फे कार्यक्रम घेतले जात आहेत. अनेक कंपन्या गुजरातमध्ये येत असल्याचे सांगितले जाते. पण तरीही गुजरातमधील तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. एकट्या गुजरातमध्ये ५२ लाख तरुण सद्यस्थितीत बेरोजगार आहेत.
भाजपचे नेते स्वतःला हिंदुंचे कैवारी म्हणवून घेतात व देशातील हिंदुंचा विकास आम्ही केला असे म्हणतात. परंतु, हिंदुत्व आणि रामाच्या नावाखाली देशामध्ये धर्माचे राजकारण करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केले आहे. वास्तविक देशातील १४० कोटी जनता महागाई, बेरोजगारी व महिलांवरील अत्याचारासारख्या समस्यांनी होरपळून निघालेले असून, मोदी सरकारने धर्माच्या नावाखाली हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडणे लावण्याचे काम केल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला.
मोदी सरकार देशातील युवा पिढीला ड्रग्जच्या आधीन करू पाहत आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण देशभर गाजले. त्यानंतर गुजरातमधील मुंद्रा पोर्ट येथे २१ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. मात्र, यानंतर कारवाईबाबत कोणतेही वृत्त समोर आले नाही. याबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. यामागे कोण आहे, याचे सत्य समोर आले पाहिजे, अशी मागणी हार्दिक पटेल यांनी केली आहे.
दरम्यान, भाजपवाले नेहमी आपल्या पोस्टर्सवर श्रीराम रावणाचा वध करताहेत, असे चित्र लावतात. मात्र, कधीही रामाने शबरीची बोरं खाल्ली, असे चित्र लावलेले दिसत नाही. श्रीराम करुणेचे सागर होते, दयावान होते, हे त्यांचे गुण कधी सांगितले जात नाही. तसेच भाजपवाले ते स्वतःही कधी आचरणात आणत नाहीत, असा टोला हार्दिक पटेलने लगावला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत वारंवार काँग्रेसने दिले आहेत. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर चाचपणी देखील करण्यात आली. २०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या संख्याबळात घट झाली. काँग्रेसचे जेमतेम २९ नगरसेवक महापालिकेत आहेत. मात्र भाजप दुसरा मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षनेते पदाची संधी काँग्रेसकडे चालून आली. विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपने न्यायालयाचे द्वारही ठोठावले. मात्र अखेर कौल काँग्रेसच्या बाजूने लागला. परंतु, फेब्रुवारी २०२२ मध्ये संभाव्य पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. यासाठी प्रभागस्तरावर चाचपणी सुरू असून काँग्रेसचे बळ वाढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.
२०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. काँग्रेसचे संख्याबळ मागील काही वर्षांमध्ये निम्म्यावर आले आहे. सध्या केवळ २९ नगरसेवक निवडून आल्याने काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे.
काँग्रेसचे संख्याबळ भाजपच्या तुलनेत निम्म्यावर आहे. मात्र राज्यात एकत्र असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुंबई महापालिकेतील प्रभाग समित्यांमध्ये कधी गैरहजेरी तर कधी तटस्थ राहून शिवसेनेलाच सहकार्य केले. त्यामुळे १२ प्रभाग समित्यांचे अध्यक्ष पद शिवसेनेच्या ताब्यात आले.
कोणत्याही समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे नसले तरी मुंबई महापालिकेतील प्रतिष्ठेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे आहे. ८३ संख्याबळ असल्याने भाजप विरोधी पक्षनेते पदाचे दावेदार होते. मात्र भाजपने पहारेकऱ्यांची भूमिका घेतल्यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे आले. कालांतराने भाजपने या पदावर दावा केला. मात्र विरोधी पक्षनेते पद परत मिळवण्यात भाजपला काही यश आले नाही.