महाराष्ट्रासाठी मोदी सरकारकडून ८६१ कोटींची मदत; चंद्रकांत पाटलांचा दावा
मुंबई: कोरोनाचा प्रकोप वाढत असताना मोदी सरकारने ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठी आर्थिक रसद पाठवली आहे. कोरोनासंबधी उपाययोजना आणि पीडितांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने २५ राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांना तब्बल ८,९२३ कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. यापैकी ८६१ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या वाट्याला आला आहे, तर उत्तर प्रदेशला सर्वाधिक १४४१ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसताना दिसत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक खोलवर झाला आहे. तसेच मृतांचा आकडाही झपाटयाने वाढताना दिसत आहे. परिणामी ग्रामीण जीवनाची घडी पूर्णपणे विस्कटण्याची शक्यता आहे.
त्यामुळे केंद्राचे पैसे ग्राम पंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना देण्यात येतील. कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे विकत घेण्यासाठी आणि सुविधा सुदृढ करण्यासाठी हा पैसा वापरता येईल. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सरकारने कोरोनाशी लढण्यासाठी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना ८९२४ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले असून यातील ८६१ कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले आहेत. @nsitharaman @nstomar pic.twitter.com/kSohfxgF9R
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 9, 2021
एकीकडे मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा आलेख काहीसा स्थिरावत असताना पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात मात्र कोरोना हाहा:कार माजवताना दिसत आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार पश्चिम महाराष्ट्रात काल दिवसभरात २१०९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे.
या चार जिल्ह्यांमध्ये मिळून रविवारी कोरोनाचे ६५०४ नवे रुग्ण आढळून आले. साताऱ्यात २२३४ नवे रुग्ण आढळून आले. तर ५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर सोलापूरात ५२ जणांचा मृत्यू तर शहरी भागात ७ जणांचा मृत्यू व ग्रामीण भागात ४५ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात काल दिवभरात १ हजार ९०८ जणांना कोरोनाची लागण तर २ हजार ६२५ जणांना देण्यात आला डिस्चार्ज देण्यात आला.
सांगलीतही अशीच चिंताजनक परिस्थिती आहे. काल दिवसभरात कोरोनाचे १३४१ नवे रुग्ण आढळून आले तर ५८ जणांनी जीव गमावला. तर कोल्हापूरमध्ये रविवारी एकाच दिवसात ५० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे हे चारही जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत.