नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारने शेतकर्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतलाय. उच्चस्तरीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खतावरील अनुदानात १४० टक्क्यांनी वाढ करत असल्याची घोषणा केलीय. म्हणजेच एका पोत्यावरील अनुदान आता ५०० रुपयांऐवजी १२०० रुपये करण्यात आलेय. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्यामुळे २४०० रुपयांऐवजी डीएपी खताची एक बॅग आता फक्त १२०० रुपयांत मिळणार आहे.
तौक्ते चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत परतले आणि खतांच्या किमतींबाबत त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि कॅबिनेट मंत्री सदानंद गौडा उपस्थित होते. पंतप्रधान मोदींना खतांच्या दरांविषयाची सविस्तर माहिती एका सादरीकरणाच्या माध्यमातून देण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर फॉस्फोरिक अॅसिड, अमोनिया इत्यादींच्या वाढत्या किमतींमुळे खतांचे दर वाढत असल्याची बैठकीत चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय किमती वाढल्या असल्या तरी जुन्या दराने शेतकर्यांना खत मिळाले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केले.
केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार डीएपी खतासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम प्रत्येक बॅगेमागे ५०० रुपयांवरून थेट १४० टक्क्यांनी वाढून १२०० रुपयांपर्यंत करण्यात आलीय. अशा प्रकारे डीएपीच्या आंतरराष्ट्रीय बाजारभावांमध्ये वाढ झाली असली तरी ती केवळ १२०० रुपयांच्या जुन्या दराने देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच केंद्र सरकारनेही दरवाढीचा संपूर्ण भार सोसावा, असा निर्णय घेतलाय. आतापर्यंत प्रति बॅग अनुदानाचे प्रमाण एकाच वेळी कधीही वाढविण्यात आले नाही. मागील वर्षी डीएपीची वास्तविक किंमत प्रति बॅग १,७००रुपये होती. ज्यामध्ये केंद्र सरकार प्रति बॅग ५०० रुपये अनुदान देत होती. त्यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना प्रति बॅग १२०० रुपये दराने खत विक्री करीत होत्या. नुकत्याच डीएपीमध्ये वापरल्या जाणार्या फॉस्फोरिक अॅसिड, अमोनिया इत्यादी आंतरराष्ट्रीय किमती ६०% वरून ७०% पर्यंत वाढल्यात. या कारणास्तव डीएपी बॅगची वास्तविक किंमत आता २४०० रुपये आहे, जे खत कंपन्या ५०० रुपयांच्या अनुदानावर १९०० रुपयांना विकतात.