
नवी दिल्ली: देशभरातील ओबीसींच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. देशातील वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यामुळे ओबीसींच्या वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतं.
ऑल इंडिया कोटा अंतर्गत ओबीसांना वैद्यकीय प्रवेशात एमबीबीएससह पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही आरक्षण देण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. लवकरच त्याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण आणि आरोग्य मंत्रालयाची बैठक बोलावली होती. या बैठकीला विधी आणि सामाजिक न्याय विभागाशी संबंधित लोकही उपस्थित होते. यावेळी मोदींनी हे आदेश देतानाच आर्थिकदृष्ट्या कमकुवत (ईएसडब्लू) असलेल्या लोकांच्या आरक्षणावर काम करण्याचे निर्देश दिले.
सध्या १५ टक्के यूजी, ५० टक्के पीजी मेडिकल सीट राज्य सरकारांद्वारे ऑल इंडिया कोटानुसार मॅनेज केल्या जातात. त्यात एससी आणि एसटीसाठी जागा आरक्षित आहेत. मात्र, ओबीसींसाठी आरक्षित नाही, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. यामध्ये ओबीसींनाही आरक्षण देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. हे प्रकरण कोर्टातही गेलं होतं. त्यामुळे कमीत कमी कालावधीत हा प्रश्न सोडवावा आणि कोर्टाच्याबाहेर यावर सहमती व्हावी, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले होते.
आर्थिकदृष्ट्या सर्व मागासांना आरक्षण देण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपमधील एक मोठा गट ओबीसी आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळेच या मुद्द्याकडे मोदी विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे मोदींनी आर्थिकदृष्ट्या मागासांनाही वैद्यकीय प्रवेशात राखीव जागा ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. मोदींनी ओबीसींच्या व्होटबँकेवर नजर ठेवून महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आधी अधिकाधिक ओबीसी मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर आता वैद्यकीय प्रवेशात ऑल इंडिया कोटाच्या अंतर्गत ओबीसी आरक्षणाचे सर्व वाद एका झटक्यात निकाली काढले आहेत.
महाराष्ट्राला किती फायदा?
देशातील वैद्यकीय प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. वैद्यकीय प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षणाबाबत पंतप्रधानांनी केंद्रीय शिक्षण मंत्री आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. यामुळे दरवर्षी महाराष्ट्रातील ७०० ते ८०० ओबीसी विद्यार्थ्यांना फायदा होणार असून, देशभरात यामुळे हजारो ओबीसी विद्यार्थ्यांना लाभ होणार, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली.