राजकारण

फडणवीसांकडून जनतेची दिशाभूल : नवाब मलिक

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्याबाबत केलेल्या दाव्यांना राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. पोलीसांच्या दैनंदिन कार्यक्रमाची माहिती देऊन देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची दिशाभूल केली आहे. फडणवीस यांनी दिलेली माहिती चुकीची आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हालचालीबाबत भ्रम निर्माण करणारी माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच कोणताही मंत्री अथवा मुख्यमंत्री पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करु शकत नाही, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

अनिल देशमुख कोरोनाची लागण झाल्याने 5 फेब्रुवारीपासून 15 तारखेपर्यंत नागपूरमध्ये रुग्णालयात दाखल होते. ते नागपूरमध्ये होम क्वॉरंटाईन होते असं कुणीही सांगितलेलं नाही. अनिल देशमुख मुंबईत होम क्वॉरंटाईन होते. 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत ते शासकीय निवासस्थानी आयसोलेशनमध्ये होते. यादरम्यान त्यांनी कुठल्याही सार्वजिनिक कार्यक्रमाता सहभाग घेतला नाही. पोलीसांच्या दैनंदिन कार्यक्रमाची माहिती देऊन देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची दिशाभूल केली आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.

देवंद्र फडणवीस यांनी पोलीस बदली घोटाळ्याच्या मुद्द्यावर केलेल्या आरोपांबाबत बोलताना नवाब मलिक यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस राज्याची मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते त्यांना चांगलं माहिती असेल कुठलाही मंत्री अथवा गृहमंत्री अधिकाऱ्यांच्या थेट बदल्या करु शकत नाही. बदल्यांसाठी पोलीस एस्टाब्लिशमेंट बोर्ड कमिटी असते. आयपीएस अधिकाऱ्यांनाच्या बदल्यांसाठी ही कमिटी प्रस्ताव तयार करते. या बोर्डमधील सदस्यांच्या शिफारशीनंतर हा प्रस्ताव गृहमंत्र्यांच्या कार्यालयात येतो. येथ हे अधिकारी आपलं मत नोंदवतात. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात मान्येतसाठी हा प्रस्ताव पाठवल्यानंतर या बदल्यांच्या ऑर्डर्स निघतात. त्यामुळे कोणताही मंत्री अथवा मुख्यमंत्री अधिकाऱ्यांची थेट बदली करु शकत नाहीत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button