महाराष्ट्रातून १२ दिवसात ९ लाख मजुरांचे स्थलांतर

मुंबई : देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे राज्यातील लाखो मजुरांचे पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात स्थलांतर सुरु आहे. या लॉकडाऊनदरम्यान कामधंदे बंद असल्याने उपासमारीने जीव जाण्याच्या भीतीने हजारो मजूर शहरे सोडून आपल्या मूळ गावी परतले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे, की आता व्यापारी किंवा मालकदेखील या लोकांना थांबवण्यास इच्छुक नाहीत. एप्रिलच्या सुरुवातीच्या १२ दिवसात महाराष्ट्रातून तब्बल ९ लाख मजुरांनी स्थलांतर करत आपल्या गावची वाट धरली असल्याची माहिती भारतीय स्टेट बँकेने सर्वेक्षणानंतर जाहीर केली आहे.
भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) केलेल्या सर्वेक्षणानुसार, एप्रिलच्या सुरुवातीच्या १२ दिवसांमध्येच महाराष्ट्रातून तब्बल ९ लाख मजुरांनी काढता पाय घेत आपल्या राज्याच्या वाटा धरल्या आहेत. १ ते १२ एप्रिलदरम्यान पश्चिम रेल्वेच्या १९६ गाड्यांमधून ४.३२ लाख लोकांनी प्रवास केला आहे. यातील १५० रेल्वे गाड्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या आहेत. यात ३.२३ लाख लोक पुन्हा आपल्या राज्यात परतले आहेत. इतकंच नाही तर यादरम्यान मध्य रेल्वेकडून चालवण्यात आलेल्या ३३६ गाड्यांमधून ४.७० लाख प्रवाशांनी महाराष्ट्रातून आपल्या राज्यात प्रवास केला आहे. या रेल्वे गाड्या उत्तर प्रदेश आणि बिहारसह आसाम, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या राज्यांसाठी होत्या.
लॉकडाऊनचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उपक्रम राबविणार्या महाराष्ट्रावर गंभीर परिणाम होतील. सध्याच्या कडक निर्बंधांमुळे राज्याला ८२ हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागू शकतं. येणाऱ्या दिवसात नियम आणखी वाढल्यास स्थितीदेखील अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. सध्याची कोलमडलेली आरोग्य व्यवस्था पाहता व्यापारीदेखील कामगारांना थांबविण्यास मागेपुढे पाहात आहेत. इंडिया एसएमई फोरमच्या महासंचालक सुषमा मोर्थानिया यांनी सांगितलं, की रुग्णालयात बेडची कमतरता ही एक मोठी समस्या बनत आहे. अशा परिस्थितीत मजूर रोखणे आणि उद्रेक झाल्यास त्यांच्या उपचाराच्या अडचणींना सामोरे जाणे हे एक मोठे आव्हान आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, व्यापारी अत्यंत गरजेचं काम असल्यासच कामगारांना थांबवत आहेत. तेदेखील केवळ अशाच लोकांना थांबवत आहेत ज्यांचा इन्शुरन्स केला गेला आहे.
अजीम प्रेमजी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक अमिल बसोले यांच्या म्हणण्यानुसार, शेवटच्या लॉकडाऊनदरम्यान कामगारांच्या पलायनादरम्यान त्यांची आर्थिक परिस्थिती बरीच खालावली होती. आता बऱ्याच दिवसानंतर हे काम त्यांनी पुन्हा सुरू केले होते. मात्र काम आता पुन्हा थांबले आहे. अशात कामगारांना पुन्हा शहराकडे येणं कठीण होईल.




