‘म्हाडा’च्या सोडतीला अखेर दसऱ्याचा मुहूर्त !

मुंबई : तब्बल तीन वर्ष रखडल्यानंतर म्हाडाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. यंदा दसऱ्याला म्हाडाच्या ९ हजार घरांची सोडत निघणार आहे. त्यामुळे मुंबई लगतच्या भागांत परवडणारी घरं घेण्याचं अनेकांचं स्वप्न साकार होणार आहे. यापूर्वी २०१८ साली म्हाडाच्या घरांची सोडत निघाली होती. पंतप्रधान आवास योजनेतील ६५००, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील २ हजार तर २० टक्के योजनेतील ५०० घरांचा या सोडतीत समावेश आहे.
यंदा दसऱ्याला म्हाडाच्या ९ हजार घरांची सोडत निघणार असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. पण आता मात्र ही सोडत काढण्याचा निर्णय म्हाडानं घेतला आहे. २०१८ मध्ये ९०१८ घरांसाठी सोडत निघाली होती. यंदाच्या दसऱ्याला ९००० घरांची सोडत काढण्यात येणार असल्याचं म्हाडाकडून जाहीर करण्यात आलं आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असतील. मीरारोड, ठाण्यातील वर्तकनगर, विरारमधील बोळींज, कल्याण, वडवली, आणि ठाण्यातील गोठेघर इथे ही घरं असतील.