म्हाडाची ४ हजार घरांसाठी सोडत; गोरेगावात मिळणार केवळ २२ लाखांत घर !
मुंबई : मुंबईत घर घेण हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सर्वसामान्यांचे हे स्वप्न आता म्हाडा पूर्ण करणार आहे. कारण म्हाडा जुलै महिन्यांत गोरेगाव परिसरात ४ हजार घरांची लॉटरी काढणार आहे. या लॉटरीतून सर्वसामान्यांना केवळ २२ लाखांत घर घेता येणार आहे. मात्र यासाठी सर्वसामान्यांना जुलैपर्यंत वाट बघावी लागणार आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून या घरांच्या सोडतीची तयारी सुरू झाली आहे. यात मुंबई उपनगरात म्हाडाकडून सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशी वन बीएचके घरे उभारली जाणार आहेत.
गोरेगावच्या पहाडी परिसरात म्हाडा ही घरं बांधणार आहे. या ४ हजार घरांपैकी सर्वाधिक म्हणजे दोन हजार घरं ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी असतील. वन बीएचके आकाराची ही घरं अगदी परवडणाऱ्या किंमतीत म्हणजे २२ लाखांत उपलब्ध होणार आहेत.
अत्यल्प उत्पन्न गटासाठी म्हाडा गोरेगाव परिसरात १९४७ घरे बांधणार आहे. तर लॉटरीतील उर्वरित घरे ही उन्नत नगर येथे बांधली जाणार आहे. गोरेगाव पश्चिम येथील बांगूर नगर परिसरातील पहाडी गोरेगावमध्ये म्हाडा ३४ मजल्याच्या सात इमारती उभ्या राहणार आहे. यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३२२.६० चौरस फूट क्षेत्रफळाची १२३९ घरे असणार आहेत. या घराची किंमत २२ लाख रुपयांपासून सुरु होणार आहे. तर मध्यम उत्पन्न गटासाठी ७९४.३१ चौरस फूट क्षेत्रफळाची २२७ घरे उभारली जाणार आहेत. याची किंमत ५६ लाख असेल. याशिवाय उच्च उत्पन्न गटासाठी ९७८.५६ चौरस फूट क्षेत्रफळाची १०५ घरे बांधली जातील. याची किंमत ६९ लाख असेल.
उन्नत नगर क्रमांक २ येथील प्रेम नगरमध्ये म्हाडा अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७०८ घरे बांधणार आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी ७३६ घरे बांधली जाणार आहेत. ही घरे ४८२.९८ चौरस फुटांची असतील. याची किंमत ३० लाख असेल. गोरेगावनंतर म्हाडा अँटॉप हिल, कन्नमवारनगर आणि दक्षिण मुंबईतल्या घरांचाही सोडत निघणार आहे. यात जवळपास १ हजार घरं बांधली जाणार आहेत.