मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतच अंतर्गत धुसफूस असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी पाडवी यांची खात्याला मिळत असलेल्या कमी निधीबाबत पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे पाडवी यांच्यासह आणखी एका काँग्रेस मंत्र्याने निधी कमतरतेबाबत पक्षश्रेष्ठींकडे गाऱ्हाणे मांडले आहे. दरम्यान, त्यामुळे काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. ही बैठक आज संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर विभागांना आस्थापना खर्च जनरलच्या बजेटमधून मिळतो तर आदिवासी विकास विभागाला मात्र विकासाच्या निधींमधून हा खर्च करावा लागत आहे. आदिवासी बांधवांचा विकास थांबवून पगार द्यावा लागत आहे. आस्थापना खर्च वाढतच आहे. त्यामुळे आदिवासी खातं फक्त पगार वाटप करणारं खातं म्हणून शिल्लक उरेल. मला माझ्या सरकार विरोधात बोलायचे नाही पण आदिवासी बांधवांच्या विकासाशी निगडीत प्रश्न असल्याने याचा खुलासा करत आहे, अशी भूमिका काँग्रेसचे मंत्री के. सी. पाडवी यांनी मांडली आहे.
केंद्राने लादलेल्या मॅचिंग ग्रँन्ड योजनांना द्यावा लागणारा निधी आणि आदिवासी विकास विभागाच्या विकास योजनांमधून आस्थापनेवर करावा लागणारा खर्च याचा ताळमेळ पाहता आगामी काळात आदिवासी विकास खात फक्त पगार वाटणार खात म्हणून शिल्लक राहील, अशा भावाना के.सी पाडवी यांनी व्यक्त केल्या आहेत. या सर्व गोष्टींबाबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना अवगत केले असून पक्षनिरीक्षकांच्या माध्यमातून हायकमांडाना देखील या साऱ्या परिस्थीतीची कल्पना दिली गेली असल्याचे सांगत मंत्री के. सी पाडवी यांनी यंदा तरी अधिकचा निधी मिळण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
जवळपास नऊ हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या आदिवासी विकास विभागाला आपला बहुतांश निधी हा आस्थापनेवर खर्च करावा लागत आहे. राज्यातील इतर विभागांना आस्थापना खर्च जनरलच्या बजेटमधून मिळतो मात्र आदिवासी विकास विभागाला हा खर्च विकासाच्या निधींमधुन करावा लागत आहे. त्यामुळेच विकासाच्या योजनांवर याचा सरळ प्रभाव पडत असून दिवसेंदिवस आस्थापनेवरील वाढता खर्च आणि शिल्लक राहणारा निधी पाहता आगामी काळात आदिवासी विकास खाते हे फक्त पगार वाटप करणारं खातं म्हणून शिल्लक राहील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील मतभेदाच्या अनेक बातम्या दर महिन्यात वारंवार समोर येत असतात. आतादेखील तशीच बातमी पुन्हा एकदा समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. आजच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर केली जाण्याची शक्यता आहे.