मंत्रिमंडळातील फेरबदलामुळे जनतेच्या जीवनात फरक पडणार का?; मार्कंडेय काटजू यांचा सवाल

नवी दिल्ली: निवृत्त न्या. मार्कंडेय काटजू यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर निशाणा साधला आहे. एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात काटजू यांनी केंद्रीय कॅबिनेटमधील ताजा फेरबदलाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अनेकांनी याचे कौतुक केले आहे. मात्र, वास्तविकता काय आहे, यामुळे सामान्य जनतेचे जीवन सुधारणार आहे का, लोकांना चांगले आयुष्य मिळणार का, अशी विचारणा काटजू यांनी केली आहे.
केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात ४३ नव्या मंत्र्यांच्या समावेशासह अनेक मोठे फेरबदल करण्यात आले. यानंतर आता विरोधकांसह अनेक स्तरातून यासंदर्भात टीका करण्यात येत आहे. मोदी सरकारमधील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले. मात्र, त्याने सामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडणार आहे का, फेरबदलाची नौटंकी करण्यापेक्षा जनतेचे जीवन सुधारण्यावर भर हवा, अशी टीका करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, यामुळे देशभरात व्यापक प्रमाणात असलेली गरिबी, बेरोजगारी, महागाई, कुपोषण, आरोग्य सेवा आणि चांगल्या शिक्षणाचा अभाव, शेतकऱ्यांवरील संकट, भ्रष्टाचार, दलित आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचार यांसारख्या समस्या दूर होणार आहेत का, याचे उत्तर नकारार्थीच आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार हे केवळ एक नाटक आहे.
भारतातील आर्थिक आणि सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी आधुनिक विचारांच्या नेत्यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक जनसंघर्ष आणि जनक्रांती करण्याची गरज आहे. यासाठी मोठा कालावधी जावा लागेल. अनेक त्याग करावे लागतील. मात्र, प्रत्येक प्रामाणिक देशभक्ताने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे काटजू यांनी म्हटले आहे.