लॉकडाऊनच्या दिशेने ठाकरे सरकारची वाटचाल
80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी अनिवार्य; आर्थिक पिळवणूक करणाऱ्या रूग्णालयांना दणका

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा 80 टक्के आणि औद्योगिक वापरासाठी 20 टक्के करावा, असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहे. राज्यातील उत्पादकांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना काढली आहे. येत्या 30 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात हे आदेश लागू राहणार आहे.
राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढवण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरिता राज्यातील ऑक्सिजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
राज्यातील ऑक्सिजनची गरज वाढली आहे. त्यामुळे साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमानुसार आरोग्य विभागाने ऑक्सिजन उत्पादित करण्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी 80 टक्के पुरवठा हा वैद्यकीय वापराकरिता ठेवावा. तर उर्वरित 20 टक्के औद्योगिक वापराकरीता पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्व खासगी हॉस्पिटल्सना इशारा
‘कोरोना’ (Coronavirus) रूग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मुजोर खासगी रूग्णालयांना मोठा दणका देणारा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. या आदेशामुळे राज्यभरातील सगळ्या रूग्णालयांवर सरकारी अंकुश प्रस्थापित झाला आहे. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या सगळ्या खासगी अथवा सामाजिक संस्थांच्या रूग्णालयांसाठी हा आदेश लागू राहणार आहे. ही रूग्णालये ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
खासगी रूग्णालये एकेका (Coronavirus) रूग्णांकडून आठ दिवसांसाठी ५ लाख, २५ लाख रुपये अशी अव्वाच्या सव्वा रक्कम उकाळत होते. सरकारने आता या पिळवणुकीला चाप लावला आहे. सरकारी व महापालिकांच्या रूग्णालयांमधील जागा मोठ्या प्रमाणात व्यापल्या आहेत. त्यामुळे कोविड (Coronavirus) रूग्णांना नाईलाजाने खासगी रूग्णालयांमध्ये भरती व्हावे लागत आहे. परंतु रूग्णांच्या या मजबुरीचा गैरफायदा खासगी रूग्णालये घेत होती. अक्षरशः लाखो रूपये उकळले जात होते. मुख्यमंत्री उद्ध व ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. दोन्ही मंत्र्यांच्या सुचनेनुसार हा आदेश आम्ही जारी केला असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी दिली. या आदेशानुसार आम्ही खासगी रूग्णालयांसाठी अत्यावश्यक सेवा कायदाही (मेस्माही) लागू केला आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयांतील डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचारी संप करू शकत नाहीत. ही सेवा बजावणे त्यांच्यावर बंधनकारक आहे. या आदेशात आपत्ती निवारण कायदाही लागू केला आहे. त्यामुळे सरकारचा आदेश खासगी रूग्णालयांनी मानला नाही, तर त्यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, अशीही माहिती सुधाकर शिंदे यांनी दिली.
खासगी रूग्णालयांसाठी बंधनकारक केलेले दर
सध्यापर्यंत खासगी रूग्णालये कोविड ( Coronavirus ) रूग्णांकडून एका दिवसासाठी ५० हजार किंवा त्यापेक्षा मनमानी पद्धतीने दर आकारत होते. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार एका दिवसासाठी जास्तीत जास्त ४ हजार, ७.५ हजार व ९ हजार रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत. आरोग्य विमा कंपन्यांनी ठरविलेल्या दरांनुसार सरकारने हे दर निश्चित केले असल्याचे आदेशात म्हटले आहे.
लॉकडाऊनसाठी मुंबईतील यंत्रणा सज्ज : अस्लम शेख
राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यातच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही रुग्णालय यंत्रणा सज्ज असल्याचे म्हणत पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहे. पालकमंत्री अस्लम शेख यांनी जाहिर पत्रकार परिषेद घेत मुंबईतील एकंदरीत रुग्णालयांच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
याबाबत बोलताना अस्लम शेख म्हणाले की, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्यात कमी पडत नाही. आज मुंबईत जरी कोरोना रुग्ण वाढत असले तरी उपचारांसाठी पाहिजे तेवढी जागा उपलब्ध आहे. मग ते महानगरपालिकेचे रुग्णालय असो वा राज्य सरकारचे रुग्णालय असो. तसेच खासगी रुग्णालयातही मुबलक जागा आहे. १६ हजारपेक्षा जास्त रुग्णालय आज महानगरपालिकेकडे आहेत. यात ४ हजार बेड्स अजून शिल्लक आहेत. आयसीयु, व्हेंटिलेटरर्समध्ये जागा आहेत. याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेडस् सरकारने आरक्षित ठेवले आहेत. आजच्या दिवशी ८० खासगी रुग्णालयांना पालिकेने आपल्या ताब्यात घेतले आहे. असे म्हणत अस्लम शेख यांनी लॉकडाऊनच्या तयारीचे संकेत दिले आहेत.