कोलकाता : अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’) ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजीरा बॅनर्जी यांना कोळसा तस्करी प्रकरणात समन बजावले आहे. याशिवाय बंगाल सीआयडीचे एडीजी ज्ञानवंत सिंग आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचे वकील संजय बसू यांनाही समन पाठवण्यात आले आहे. ईडीने टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांना ६ सप्टेंबरला, तर त्यांची पत्नी रुझीरा यांना ३ सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे.
यासंदर्भात ईडीला असे आढळून आले होते, की अभिषेक बॅनर्जी आणि त्याच्या कुटुंबाशी संबंध असलेल्या दोन कंपन्यांना – लीप्स अँड बाउंड प्रायव्हेट लिमिटेड आणि लीप्स अँड बाउंड मॅनेजमेंट सर्व्हिसेस एलएलपीला संरक्षण निधी म्हणून जवळपास ४.३७ कोटी रुपये मिळाले होते. हे पैसे कोळसा तस्करी प्रकरणात ज्यांची चौकशी सुरू आहे, त्या आरोपींनी एका बांधकाम कंपनीच्या माध्यमाने दिले होते.
अभिषेक बॅनर्जींचे वडील अमित बॅनर्जी हे लीप्स आणि बाउंड प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांपैकी एक आहेत, तर त्यांची पत्नी रुजीरा अमित बॅनर्जी यांच्यासह लीप आणि बाउंड मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडच्या संचालक आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्त वाहिनीला सांगितले, की बेकायदेशीर कोळसा खाण प्रकरणात मनी लाँडरिंगमध्ये अडकलेल्या भ्रष्ट राजकारण्यांनी मोठ्या षडयंत्राने वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून बनावट करार करून निधी जमवला होता.