ऑलिम्पिक आयोजनाबाबत लवकर निर्णय घ्या; फेडररची मागणी

टोकियो : जपानमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आला आहे. त्यातच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यावर्षी झाल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढेल. तसेच कोरोनाचा प्रादुर्भावही वाढण्याचा धोका असल्याने ही स्पर्धा रद्द करण्याची स्थानिक नागरिक मागणी करत आहेत. ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी याचिका करण्यात आली असून त्यावर साडे तीन लाखांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे यंदा टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अवघे दहा आठवडे शिल्लक असताना खेळाडूंना अजूनही ही स्पर्धा होणार की नाही, हे नक्की माहित नाही. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबतचा निर्णय लवकर घेतला जाणे खेळाडूंच्या दृष्टीने खूप महत्वाचे असल्याचे मत स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने व्यक्त केले.
सध्याची परिस्थिती अवघड आहे. आम्हाला खेळाडूंनाही अजून फारशी माहिती मिळालेली नाही. टोकियोचे बरेचसे रहिवासी ऑलिम्पिकला विरोध करत असल्याचे मी ऐकले आहे. परंतु, आम्हाला याबाबत काहीही सांगण्यात आले नसल्याने ऑलिम्पिक ठरल्याप्रमाणे होण्याची शक्यता आहे. ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. खेळाडूंना स्पर्धा होणार की नाही, हे लवकरात लवकर कळले पाहिजे, असे फेडरर म्हणाला.
जगभरात कोरोनाचा धोका पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय झाला तरी फेडररचा या निर्णयाला पाठिंबा असेल. याबाबत त्याने सांगितले, मला ऑलिम्पिकमध्ये खेळून स्वित्झर्लंडसाठी पदक जिंकायला नक्कीच आवडेल. तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असेल. परंतु, सध्याची परिस्थिती लक्षात घेता, ऑलिम्पिक रद्द करण्याचा निर्णय झाला, तरीही मी समजू शकतो. मात्र, खेळाडूंच्या दृष्टीने जो निर्णय असेल, तो लवकरात लवकर घोषित करणे गरजेचे आहे.