
मुंबई/नवी दिल्ली : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून गेल्या २४ तासांत तब्बल १८ हजार ४६६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णवाढीचं मुंबई हे केंद्र ठरताना दिसत आहे. मुंबईत आज १० हजाराहून अधिक रुग्णवाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ५५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६६ हजार ३०८ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात दिवसभरात ७५ नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील ४० रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांचा आकडा ६५३ इतका झाला आहे. यातील ४०८ रुग्ण मुंबईत आहेत. तर पुण्यात ७१ रुग्णांची नोंद आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी विशेष बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान, देशात गेल्या २४ तासांमध्ये काेराेनाचे ३७ हजार ३७९ नवे रुग्ण आढळले. ‘ओमायक्राॅन’ व्हेरिएंटमुळे भारतात तिसरी लाट सुरू झाल्याचे काेविड टास्क फाेर्सचे प्रमुख डाॅ. एन. के. अराेरा यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, केरळ व गुजरात ही राज्ये ‘ओमायक्राॅन’ची सुपर स्प्रेडर आहेत.
कोरोनाच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी पाहिली तर राज्यात आतापर्यंत ६७ लाख ३० हजार ४९४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६५ लाख १८ हजार ९१६ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या १ लाख ४१ हजार ५७३ झाली आहे.
राज्यात मिनी लॉकडाऊन?
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यातच देशात ओमायक्रॉन व्हेरियंटसह कोरोनाचं संकट वाढत असल्यानं अनेक राज्यांमध्ये नियम कडक केले जात आहेत. आता पश्चिम बंगाल, हरियाणा मध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये सर्व शाळा, कॉलेज, सलून, उद्यानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच खासगी आणि सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही ५० टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत. एकप्रकारे जवळजवळ बंगालमध्ये मिनी लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील मिनी लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
राज्यात १३ मंत्री आणि ७० आमदारांना लागण
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना राजकीय क्षेत्रातील व्यक्ती कोरोना संक्रमित होण्याचं प्रमाण देखील वाढत आहे. लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात सापडत असून आतापर्यंत राज्याचे १३ मंत्री आणि ७० आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्यात बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, एकनाथ शिंदे, धीरज देशमुख, रोहित पवार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, केसी पाडवी, प्रताप सरनाईक, माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक आमदार आणि मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील १ ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार
पुण्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. एका दिवसात १०० च्या आत असणारी रुग्णसंख्या आज थेट हजारांवर येऊन पोहोचली आहे. कालच महापौर मुरलीधर मोहोळ यांनी निर्बंध वाढवण्याबाबत अजिबात पवारांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पुणे शहरातील १ ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. नववी ते दहावीचे वर्ग सुरू राहतील, कारण या वयोगटातील मुलांना लसीकरण सुरु झाल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
देशात २४ तासांत ३७ हजारांहून अधिक रूग्णांची भर
देशात गेल्या २४ तासांमध्ये काेराेनाचे ३७ हजार ३७९ नवे रुग्ण आढळले. रुग्णांत ‘ओमायक्राॅन’बाधितांची संख्या १८९२ आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने दिल्ली, बिहार, गोवा, पंजाबसह अनेक राज्यांनी निर्बंध लावले असून पुन्हा लाॅकडाऊनच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
अमेरिकेत १० लाखांहून अधिक नवे रुग्ण
अमेरिकेत काेराेना रुग्णांची आतापर्यंतची उच्चांकी संख्या नाेंदविण्यात आली. अमेरिकेत २४ तासांमध्ये १०.४२ लाख रुग्ण आढळले. अमेरिकेत १ जानेवारीला १.६१ लाख, ३ तारखेला १० लाखांहून अधिक रुग्णांची नाेंद झाली.फ्रान्समध्ये एकाच दिवसात ५८ हजार, तर ब्रिटनमध्ये १.३७ लाख रुग्ण आढळले.
दिल्लीत वीकेंड कर्फ्यू; शनिवार व रविवारी संपूर्ण लाॅकडाऊन
काेराेनाचा दिल्लीत प्रकाेप वाढला असून गेल्या ८ दिवसांत ११ हजार काेराेनाबाधित आढळल्यानंतर दिल्ली सरकारने विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. त्यानुसार शनिवार व रविवारी शहरात संपूर्ण लाॅकडाऊन असेल. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून काेराेनाचे रुग्ण माेठ्या प्रमाणात शहरात दिसून येत आहे. दिल्लीतील संक्रमण दर साडेसहा टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. मंगळवारी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (डीडीएमए) बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बाेलताना उपमुख्यमंत्री मनीष सिसाेदिया म्हणाले, “सलग दाेन दिवसांपासून संक्रमण दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे शहरातील काेराेना निर्बंध अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे. दिल्ली शहर ‘ग्रेप’ मानकांनुसार आता रेड झाेनमध्ये आलेले आहे.
मेट्राे व डीटीसी बसमध्ये पूर्ण आसनक्षमतेने प्रवासी प्रवास करून शकतील. याआधीच ही क्षमता केवळ ५० टक्के केली हाेती. नव्या निर्बंधानुसार दिल्लीत शनिवार व रविवारी संपूर्ण लाॅकडाऊन असेल. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी वगळून दिल्लीतील शासकीय कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा आहे. राजधानीतील खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के राहील, असे सिसाेदिया म्हणाले.
बिहारमध्ये नाइट कर्फ्यू, भाविकांसाठी मंदिरं पुन्हा बंद, सिनेमागृहांनाही टाळे !
बिहारमध्ये कोरोना रुग्ण संख्या प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. यामुळे आता राज्य सरकारने रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत मंदिरेही भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. सिनेमागृहांनाही टाळे लावण्यात आले आहेत.
नव्या आदेशांनुसार, बिहारमध्ये रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. सध्या ६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान नाईट कर्फ्यू लागू असेल. याशिवाय अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र पुढील आदेश येईपर्यंत सर्व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. सिनेमा हॉल, जिम, पार्क, क्लब, स्टेडियम आणि स्विमिंग पूल पूर्णपणे बंद राहतील.
रेस्टॉरंट, ढाबा ५० टक्के क्षमतेने उघडू शकतील. विवाह सोहळ्याला जास्तीत जास्त ५० व्यक्ती आणि अंत्यसंस्काराला जास्तीत जास्त २० व्यक्ती उपस्थित राहू शकतील, असेही सांगण्यात आले आहे. याच बरोबर, सर्व राजकीय आणि सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांना परवानगी असेल. इयत्ता ९-१२ चे वर्ग आणि महाविद्यालये ५० टक्के उपस्थितीसह खुले होतील, तर प्राथमिक ते आठवीपर्यंतचे सर्व वर्ग ऑनलाइन चालतील.
याशिवाय, सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयेही ५० टक्के उपस्थितीने उघडतील. या बंधनांमागील कारण म्हणजे, बिहारमध्ये एका दिवसात कोरोनाचे ८९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. राजधानी पाटण्यात सर्वाधिक ५६५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, नितीश कुमार यांनी सामाजिक सुधारणा अभियान दौरा आणि त्यांचा साप्ताहिक जनता दरबार कार्यक्रम २१ जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्याचीही माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.