महाराष्ट्रात ‘भगव्या’चं राज्य येते आहे; आ. नितेश राणेंचे संकेत

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपसोबत युती करा अशी मागणी करणारं पत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या पत्रानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्रात भगव्याचं राज्य येते आहे. हीच ती वेळ असं म्हणत एकप्रकारे राज्यातील राजकारणात आगामी काळात राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत कुरबुरी सुरु असल्याचे दिसते. एकीकडे महाविकास आघाडीतला मित्रपक्ष काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढवू अशी भूमिका मांडत आहे. दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी आम्ही एकत्रित निवडणुका लढवू असं म्हणत काँग्रेसला सूचक इशारा देत आहेत. यातच अलीकडेच शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येतील अशीही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. या बैठकीत शिवसेना-भाजपा एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1406520271385894912
दिल्लीवारीनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात गेल्या पाच-सात दिवसांत ४० मिनिटं फोनवर चर्चा झाल्याचं समजतं. या चर्चेदरम्यान मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर भाजपाचा सत्तास्थापनेचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली. महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडल्यास मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच राहील आणि भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री असतील, त्याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही शिवसेना-भाजपा एकत्र लढवतील, अशी चर्चा मोदी-ठाकरेंमध्ये झाल्याचं कळतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ३० जागा लढवेल आणि शिवसेनेला १८ जागा दिल्या जातील, तर विधानसभा निवडणुकीत २८८ जागांचं समसमान वाटप होईल आणि जो जास्त जागा जिंकेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, इथपर्यंत या दोन नेत्यांचं बोलणं झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.




