मुंबई : दिल्ली पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना अटक केल्याप्रकरणात एक दहशतवादी मुंबईचा असून राज्यात मुंबई लोकलची रेकी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अतिशय योग्य पद्धतीनं संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करू दिलं पाहिजे, यात राजकारण आणण्याची काहीच गरज नाही, असं विधान केलं आहे. ते मुंबईत बोलत होते.
राज्याच्या पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या ६ दहशतवाद्यांपैकी एक जण मुंबईतला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आज सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत मी बैठक घेतली. त्यांनी या संदर्भातील सर्व माहिती मला दिली आहे. चौकशीसाठी आणखी काही वेळ जाणार आहे. प्रकरण संवेदनशील आहे. त्यामुळे राजकारणाचा विषय नाही. यातील वस्तुस्थितीची माहिती सर्वांना मिळावी यासाठी एटीएसचे प्रमुख आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. पोलिसांना चौकशीबाबत संपूर्ण स्वातंत्र्य असून ते त्यांच्या पद्धतीनं तपास करत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करु द्यायला हवं. उगाच कुणी राजकारण करण्याची गरज नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
आशिष शेलारांनी केली होती टीका
दिल्ली पोलिसांचं विशेष पथक मुंबईतून एका दहशतवाद्याला अटक करत मग राज्याचं एटीएस काय झोपलं होतं का? असा सवाल उपस्थित करत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. राज्याच्या पोलीस दलात सरकारचा हस्तक्षेप वाढला असून नको त्या कामासाठी पोलिसांचा वापर केला जात असल्यानं अशा महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाही, असा आरोप शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.