ठाण्यात आढळला राज्यातील पहिला म्युकोरमायकोसिस रुग्ण
ठाणे : म्युकोरमायकोसिस या आजाराची चर्चा सुरु असतानाच ठाणे जिल्ह्यात या आजाराचा पहिला रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर देखील होत असून यामध्ये रुग्णांचे डोळे निकामी होत असल्याच्या घटना समोर येत आहे. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात समोर आली आहे. सध्या म्युकोरमायकोसिस झालेल्या या महिलेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात एका ५६ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. ती महिला कोरोनावर उपचार घेत असताना तिच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे समोर आले. याची रुग्णालयाने गांभीर्याने दाखल घेत त्यांच्या काही चाचण्या केल्या. या चाचणी अहवालातून त्यांना म्यूकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील पहिला म्युकोरमायकोसिस रुण हा ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात आढळला आहे.
सध्या या महिलेला कोरोना या आजारामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यावेळी त्यांचा उजवा डोळा लाल झाल्याचे दिसून आले. त्यावेळी तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क साधला. तसेच रुग्णाची तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी त्या महिला रुग्णांची तपासणी केली. त्यावेळी त्या महिलेचे डोळे वर आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच त्यांच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नव्हती. तसेच लाईट दाखवल्यानंतर देखील त्यांच्या डोळ्यातील बाहुलीची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यानंतर त्यांचे सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उजव्या डोळ्याच्या मास पेशींना सूज असल्याचे दिसून आले. तर, सायनसमध्ये देखील सूज असल्याचे त्या अहवालातून समोर आले आहे. या सर्व बाबींवरून त्या महिलेला म्युकोरमायकोसिस हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले.