
मुंबई : राज्यातील दुकानं आजपासून दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर राज्यात संचारबंदी असेल. कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यातील शहरं आणि जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच लेव्हलमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.
मुंबईतील निर्बंध काय?
– अत्यावश्यक दुकाने -दररोज सकाळी ७ ते दुपारी ४
– इतर दुकाने- सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ खुली राहातील. ही दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद असतील.
– मॉल, थिएटर पूर्णपणे बंद राहतील.
– हॉटेल- सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के खुली राहातील. त्यानंतर पार्सल सुविधा देता येईल. हॉटेल शनिवारी व रविवारी बंद राहातील.
– रेल्वेसेवा- सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहील.
– मॉर्निंग वॉक, मैदाने, सायकल चालविण्यासाठी पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत मुभा.
– मनोरंजन कार्यक्रम-५० टक्के आसनव्यवस्थेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत.
– लग्नसोहळे- ५० टक्के क्षमतेने तर, अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी २० व्यक्तींना मुभा.
– खासगी कार्यालये – ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहातील.
– सरकारी कार्यालये- ५० टक्के क्षमतेने सुरू राहातील.
– आऊटडोअर क्रीडा- पहाटे ५ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९.
– स्टुडिओत चित्रीकरणास परवानगी.
– बांधकाम- दुपारी ४ वाजेपर्यंत मुभा
– कृषी- सर्व कामांना मुभा.
– ई कॉमर्ससाठी परवानगी.
पुण्यात काय सुरु, काय बंद?
पुण्यात आधीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे. आजपासून (२८ जून) पुणेकरांना नवीन नियमांचं पालन करावं लागणार आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार-रविवार पूर्णपणे बंद राहतील. पुण्यात सध्या दुकाने सात वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी होती.
कल्याण डोंबिवलीतही नव्या निर्बंधांची अंमलबजावणी
कोविडच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहता राज्य शासनाने आजपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आता लेव्हल ३ मध्ये समावेश करण्यात आला असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही त्यानुसार निर्बंध लागू होत आहेत. केडीएमसीचा या आठवड्यात लेव्हल २ मध्ये समावेश झाल्याने निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाले होते. मात्र राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे केडीएमसीलाही लेव्हल ३ मध्ये समाविष्ट करण्यात आले असून प्रशासनाने यासंदर्भातील नवीन आदेश नुकतेच जारी केले आहेत. सोमवार २८ जून ते ५ जुलैपर्यंत त्यांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.