आज मध्यरात्रीपासून सीएनजी, घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात मोठी वाढ

मुंबई : एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाल्याने सर्व सामान्य माणूस पोळलेला असताना आता सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात मोठी वाढ होणार आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
गॅस पाइप लाईन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्चाचे नियोजन करण्यासाठी ही दरवाढ करण्यात येणार असल्याचे महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने स्पष्ट केले आहे. यानुसार आज मध्यरात्रीपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) मध्ये थेट २.५८ प्रति किलो आणि पीएनजी गॅसच्या किंमतीत ०.५५ रुपये प्रति युनिटने वाढ केली जाणार आहे. हे दर १३ जुलै २०२१ च्या मध्यरात्री, १४ जुलै २०२१ रोजी सकाळी मुंबईत लागू होतील.
या नव्या दरवाढीनुसार मुंबई आणि आसपासच्या सीएनजी, घरगुती पीएनजीच्या सुधारित किंमती या ५१.९८ प्रति किलोग्रॅम आणि ३०.४०/ एससीएम (स्लॅब १) आणि ३६.००/ एससीएम (स्लॅब २) अशा होणार आहेत. अंतरानुसार यामध्ये कमी अधिक फरक असणार आहे. असे असले तरी देखील मुंबईत सध्या पेट्रोल आणि डिझेल दरांच्या तुलनेत सीएनजी अनुक्रमे ६७ टक्के आणि ४७ टक्के कमी असणार आहे. तसेच घरगुती एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत पीएनजीचे दर ३५ टक्क्यांनी कमी असणार आहेत.