काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये गेलेल्या लुईजिन्हो फालेरोंची थेट राज्यसभेवर वर्णी
नवी दिल्ली: गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुईजिन्हो फालेरो यांनी पक्षाचा राजीनामा देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लुईजिन्हो फालेरो यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना थेट राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. अर्पिता घोष यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर लुईजिन्हो फालेरो यांना संधी देण्यात आली.
माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फालेरो यांनी सप्टेंबर महिन्यात काँग्रेस सोडली होती. लुईजिन्हो फालेरो यांच्या रुपात तृणमूल काँग्रेसला मोठा चेहरा मिळाला होता. लुईजिन्हो फालेरो यांना नोव्हेंबरमध्ये राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. लुईजिन्हो फालेरो गोव्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तर, त्यांनी त्रिपुराचे काँग्रेस प्रभारी म्हणून देखील काम केलेलं आहे. त्यामुळं टीमएसीसाठी लुईजिन्हो फालेरो गोवा आणि त्रिपुरामध्ये फायदेशीर ठरणार आहेत. फालेरो यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे वर्णन ‘स्ट्रीट फाइटर’ असे केले होते.
लुईजिन्हो फालेरो म्हणाले, आपण हे दुःख संपवू आणि गोव्यात एक नवी पहाट आणू. मी म्हातारा आहे पण माझे रक्त तरुण आहे. ‘नावेलीम विधानसभेतील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि भविष्यातील वाटचालीत नावेलीममधील जनेतेनं समर्थन द्यावं, अशी अपेक्षा लुईजिन्हो फालेरो यांनी केली होती.
तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी त्यांचा पक्ष गोव्यातील विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा करेल, असं म्हटलं होतं. पक्ष लवकरच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करेल, असंही ते म्हणाले होते. ममता बॅनर्जी यांनी गोव्याचा दौरा देखील केला होता.