
टोक्यो : भारताची आघाडीची बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन हिला आज झालेल्या महिलांच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्य लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिला तुर्कस्थानच्या विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अंतिम फेरी गाठून सुवर्णपदकासाठी दावेदारी सादर करण्याचे लवलिनाचे स्वप्न भंगले आहे.
आज झालेल्या उपांत्य लढतीत लवलिना हिला अपेक्षेनुसार खेळ करता आला नाही. विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेली हिने पहिल्या फेरीपासूनच प्रतिस्पर्धी लवलिनावर वर्चस्व राखले. अखेर तिन्ही फेऱ्यांमध्ये विजय मिळवत बुसेनाज सुरमेनेलीने सामन्यात विजय मिळवला.
ऑलिम्पिकमध्ये लवलिना बोर्गोहाईनने जर्मनीची अऩुभवी बॉक्सर नॅडीने अॅपेत्झवर ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर लवलिनाने महिलांच्या ६९ किलो वजनी गटात तैवानच्या निएन चिन चेनवर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली होती
दरम्यान, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या लढतींना सुरुवात झाल्यापासून भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा दिसून येऊ लागला आहे. आज झालेल्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या लढतींमध्ये रवी कुमार दहिया आणि दीपक पुनिया या भारतीय कुस्तीपटूंनी जोरदार खेळ करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
आज सकाळी झालेल्या पुरुषांच्या भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्रा याने जबरदस्त कामगिरी करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. अ गटात समावेश असलेल्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात तब्बल ८६.६५ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले. मात्र भालाफेकीच्या पात्रता फेरीत ब गटात समावेश असलेल्या भारताच्या शिवपाल सिंह याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.