राजकारण

‘लेटर बॉम्ब’प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत सचिन वाझे यांच्यामार्फत पैसेवसुलीचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे राज्याचं पोलीस दल आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली असतानाच ठाकरे सरकारने एक पाऊल मागे येत या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमून अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, अनिल देशमुख यांनी रात्री १२ वाजून १८ मिनिटांनी एक महत्त्वाचं ट्विटही या संदर्भात केलं आहे. राज्य शासना्च्या या निर्णयानंतर गृहमंत्री देशमुख (Anil Deshmukh Tweet) यांनी ट्विट करत ‘दूध का दूध, पाणी का पाणी करावे’, असं म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांनी सध्या निलंबित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. याप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी करतानाच अनिल देशमुख यांचा राजीनामाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागितला आहे. दरम्यान, फडणवीस यांची राजीनाम्याची मागणी आधीच महाविकास आघाडी सरकारने फेटाळलेली असून आता चौकशीचे पाऊल मात्र उचलण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बुधवारी रात्री एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खुद्द अनिल देशमुख यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रमुख मंत्री उपस्थित होते. या बैठकीत अनिल देशमुख यांच्यावर परमबीर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या आयोगाचे प्रमुख निवृत्त न्यायमूर्ती असतील व हा आयोग लवकरच नेमण्याचा निर्णयही या बैठकीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बैठकीत परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्र लिक होणे, याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबत लवकरच चौकशी आयोग नियुक्त केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

निनावी व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार
या बैठकीत अॅटर्नी जनरल आशुतोष कुंभकोण यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेण्यात आला. रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात सरकारची भूमिका काय असावी यावरही चर्चा झाली. त्यानंतर फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्र लिक होण्या संदर्भात निनावी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात गुरुवारी राज्यपालांची भेट
महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्री गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. यावेळी सरकारची बाजू राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमोर मांडली जाणार आहेत. तत्पूर्वी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यातील सर्व प्रकरणाबाबत राज्य सरकारकडून तातडीने अहवाल मागवण्याची मागणी भाजप नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button