काँग्रेसला एकटं लढू द्या, देखते है किसमे कितना है दम : भाई जगताप
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा सूर काँग्रेसकडून पुन्हा एकदा आळवण्यात आला आहे. तुम्ही महाराष्ट्रातील परिस्थिती बघत आहात. काँग्रेसला तिसरा पक्ष म्हटले जाते. कोरोना काळात तुम्ही काँग्रेसचे काम पाहिले असेल. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला एकटं लढू द्या, देखते है किसमे कितना है दम, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पक्ष नेतृत्वाला केले आहे.
भाजपला सोडचिठ्ठी देऊन ‘घरवापसी’ करणाऱ्या सुनील देशमुख यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात भाई जगताप आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसने स्वतंत्रपणेच निवडणुका लढवाव्यात, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील हेदेखील उपस्थित होते. यावेळी भाई जगताप यांनी काँग्रेसने स्वबळावर लढावे, असे मत बोलून दाखवले.
पृथ्वीराज चव्हाण यांनीही २०२४ मध्ये काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावा केला. काँग्रेस सोडून गेलेल्या अनेक नेत्यांना आता पश्चाताप होत आहे. ते आता घरवापसी करत आहेत. २०२४ मध्ये राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान झाला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
भाजपचा दुटप्पी चेहरा लोकांसमोर आणला पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले. राज्यात भाजपची सत्ता येईल, असे वाटल्यामुळे अनेकजण तिकडे गेले. पण आता या नेत्यांची भाजपमध्ये अडचण होत असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.