
मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सुरु होते. दोन्ही बाजूंच्या नेत्यांचे प्रयत्न मुंबई, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारमध्ये फळाला आले. नागपूर आणि अकोल्यात मात्र निवडणूक होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मुंबईत भाजपचे राजहंस सिंह, तर शिवसेनेचे सुनील शिंदे, कोल्हापुरात काँग्रेसचे सतेज पाटील, तर धुळे-नंदुरबारमध्ये भाजपचे अमरिश पटेल हे विधान परिषदेवर बिनविरोध जाणार असल्याचं आता स्पष्ट झालंय.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कालपासून दिल्लीत आहेत. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आज दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर फडणवीस आणि पाटील यांची वरिष्ठांशी चर्चा झाली. दुसरीकडे राज्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची आणि फडणवीस, पाटील यांच्यातही चर्चा सुरु होती. मुंबई आणि धुळे-नंदुरबारच्या बदल्यात काँग्रेसला कोल्हापूरची जागा देण्यावर एकमत झालं. त्यानंतर दुपारी दीड वाजता फडणवीस यांनी भाजप नेते धनंजय महाडिकांना फोन करुन भाजप उमेदवार अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितलं. पक्षादेश आल्यानं अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोल्हापुरातून काँग्रेस नेते सतेज पाटील यांचि बिनविरोध निवड झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
धुळे-नंदुरबारमध्ये अमरिश पटेल बिनविरोध
धुळे-नंदुरबारमध्ये भाजपनं तगडा उमेदवार दिलाय. भाजपनं अमरिश पटेल यांना रिंगणात उतरवलं आहे. तर काँग्रेसकडून नवख्या गौरव वाणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, धनंजय महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि धुळे-नंदुरबारच्या बदल्यात भाजपनं काँग्रेसला कोल्हापूरची जगा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गौरव वाणी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील हे स्पष्ट झालंय. अशावेळी धुळे-नंदुरबारमधून अमरिश पटेल यांचीही बिनविरोध निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबईत शिवसेनेचे सुनील शिंदे, भाजपचे राजहंस सिंह बिनविरोध
दुसरीकडे मुंबईतून भाजपने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडणाऱ्या सुनील शिंदे यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. मात्र, काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यानं मुंबईत निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, कोपरकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे राजहंस सिंह आणि शिवसेनेचे सुनील शिंदेही विधान परिषदेवर बिनविरोध जाणार आहेत.
नागपुरात बावनकुळे विरुद्ध भोयर लढत होणार
भाजपकडून नागपूरची जागाही बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी ताठर भूमिका घेतल्यामुळे नागपुरात बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे नागपुरात आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांच्यात निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, नागपूरसाठी भाजपकडून आम्हाला कुठलाही प्रस्ताव आला नाही. या निवडणुकीत कुणाकडे किती नंबर याला काही महत्व नसतं. काँग्रेस उमेदवार छोटू भोयर विजयी होतील असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध छोटू भोयर अशी तगडी फाईट होण्याची शक्यता आहे.
अकोल्यात वंचितचे संख्याबळ निर्णायक
अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व अपक्ष मतदार हे विजयाचा ‘जॅकपॉट’ ठरणार आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून आता त्यांची मनधरणी केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगणार आहे. शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बजोरिया विरुद्ध भाजपचे वसंत खंडेलवाल आमनेसामने आहेत. मात्र, या निवडणुकीत विजयाचा ‘’मॅजिक आकडा’ गाठण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी ‘जॅकपॉट’ समजल्या जाणाऱ्या वंचित बहुजन आघाडीसह अपक्षांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे.