Top Newsस्पोर्ट्स

‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन

पत्नीच्या निधनानंतर पाचच दिवसांत घेतला अखेरचा श्वास

चंदीगड : भारताचे माजी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे शुक्रवारी रात्री निधन झाले. पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास चंदीगड येथील पीजीआई रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा आणि भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंग व तीन मुली असा परिवार आहे. एक महिन्यापासून त्यांचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी व भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी कोरोना संक्रमणामुळे पाच दिवसांपूर्वी अखेरचा श्वास घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खा सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

शुक्रवारी संध्याकाळपासूनच त्यांची प्रकृती खालावली होती. ऑक्सिजनची पातळीही खूप कमी झाली होती. गेल्याच महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मिल्खा सिंग यांची कोरोना चाचणी बुधवारी निगेटिव्ह आली होती.

मिल्खा सिंग यांनी चार वेळा आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले असून १९५८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी केली होती. १९६० सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये काही शतांशच्या फरकाने त्यांचे कांस्य पदक हुकले होते. १९५९ साली मिल्खा सिंग यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

मिल्खा सिंग यांच्या जीवनावर ‘भाग मिल्खा भाग’ या नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला होता. मात्र,चित्रपटात मिल्खा सिंग यांच्या जीवनातील थोडासाच संघर्ष दाखवण्यात आला होता. फ्लाईंग सिख या नावाने देखील ते प्रसिद्ध होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण महान खेळाडूला मुकलो आहोत. त्यांनी देशाच्या असंख्य नागरिकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणं हे फार दुख:द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये मिल्खा सिंह यांच्याशी गेल्या काही दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं. ती चर्चा अखेरची असेल असं वाटलं नव्हतं, असं देखील मोदी म्हणाले.

पत्नीच्या मृत्यूनंतर ५ दिवसातच अखेरचा श्वास

मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला कौर यांचा ५ दिवसांपूर्वीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मिल्खा सिंग यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. मिल्खा सिंग यांच्या कुटुंबीयांनी दोघांच्याही एकापाठोपाठ मृत्यूबद्दल बोलताना त्यांच्यातील प्रेमपूर्ण संबंधांच्याही आठवणींना उजाळा दिलाय. मिल्खा सिंग यांच्या कुटुंबाने सांगितलं, “मिल्खा सिंग यांचा मृत्यू झाल्याचं सांगताना आम्हाला अतीव दुःख होत आहे. त्यांनी कोरोनाला कडवी झुंज दिली. निर्मलाजी यांच्या मृत्यूनंतर मिल्खाजींचा अवघ्या ५ दिवसांनी मृत्यू होणं हे त्या दोघांमधील खरं प्रेम दर्शवतं.”

मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची प्रेम कहाणी

मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजरेला नजर खेळाच्या मैदानावरच झाली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्टी सुरु झाली. विशेष म्हणजे याआधी मिल्खा सिंग यांचे अनेक मुलींसोबतच्या प्रेमाच्या चर्चाही गाजल्या होत्या. मिल्खा सिंग यांचं नाव एक किंवा दोन नव्हे तर चांगल्या तीन मुलींसोबत जोडलं केलं आणि त्यांच्या प्रेमाचे किस्सेही चर्चिले गेले होते. मात्र, यापैकी कुणाशीही त्यांचं लग्न झालं नाही. कारण अ‍ॅथलेटिक्सच्या राजाचं मैदानावर हॉलीबॉलच्या राणीवर प्रेम जडलं.

मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजरेला नजर १९५५ मध्ये कोलंबोत झाली होती. तेथे एका उद्योगपतीने भारतीय खेळाडूंसाठी डिनर आयोजित केला होता तेथेच दोघांची एकमेकांशी ओळख झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले. तेव्हा त्यांनी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिल्याचाही किस्सा सांगितलाय.

पहिल्या भेटीनंतर १९५८ मध्ये दोघे पुन्हा भेटले. मात्र, त्यांच्या प्रेमाच्या गाडीने १९६० मध्ये वेग पकडला. तेव्हा दोघांची भेट दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठं नाव बनले होते. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचं प्रेम वाढत केलं. मिल्खा सिंग यांचं नाव मोठं झालेलं असलं तरी निर्मला कौर या हिंदू आणि मिल्खा सिंग शिख असल्यानं निर्मला कौर यांच्या वडिलांचा त्याला विरोध होता. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा आला. यावेळी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button