नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालयात काळ्या कोटचा रुबाब, आदरयुक्त भीती आणि अभ्यासू जरब निर्माण करणाऱ्या महिला वकिलांनी वर्दीतील दर्दी आणि हौशी कलाकार असतात हे दाखवून दिले.
सालाबादप्रमाणे नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात कार्यरत असणाऱ्या महिला वकिलांच्या आयोजन समितीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले जाते. यंदाही आयोजन समितीच्या वतीने हा सुबक स्नेहमेळावा जिल्हा न्यायालयाच्या आवारात सोमवारी उत्साहात पार पडला. सर्व महिला न्यायाधीश व सरकारी वकील, पोलिस कर्मचारी यांनी या कार्यक्रमांत आपला सहभाग आपुलकीने नोंदवला.
यावेळी आयोजित केलेल्या उखाणे, मेहंदी, गायन आणि एकांकिका स्पर्धेत महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. अॅड. वृषाली रकिबे, अॅड. वसुंधरा रामराजे, अॅड. अपर्णा कुलकर्णी, अॅड. पुष्पा ढवळे, अॅड. वैशाली कोकाटे, अॅड. निलोफर शेख या वकील महिला विविध स्पर्धेत विजेत्या ठरल्या. विजेत्यांना आयोजन समितीच्या वतीने ट्रॉफी देण्यात आली.
आयोजक समीतीच्या वतीने अॅड. सोनल कदम, अॅड. श्रद्धा कुलकर्णी, अॅड. स्वप्ना राऊत, अॅड. पूनम शिनकर, अॅड. प्रणिता कुलकर्णी, अॅड. राणी रंधे-तळेकर, अॅड. सुप्रिया आमोदकर , अॅड. अश्विनी गवते व अॅड. सोनल गायकर यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.