Top Newsराजकारण

लखीमपूर हिंसाचार; गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाविरोधात ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

लखीमपूर: लखीमपूर खेरी हिंसाचाराला आज ९० दिवस पूर्ण झाले आहेत. याप्रकरणी एसआयटीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र ५ हजार पानांचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनीसह नातेवाईक वीरेंद्र कुमार शुक्लाचे नावही जोडले गेले आहे. वीरेंद्र कुमार शुक्ला यांच्यावर कलम २०१ अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचे आरोप आहेत.

न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांच्या वकिलांनी सांगितले की, आरोपपत्रात मंत्री अजय मिश्रा यांचे नाव जोडण्यासाठी अर्ज करण्यात आला होता, मात्र त्यांचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या निदर्शनादरम्यान गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी याने शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप आहे. त्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला होता. विशेष तपास पथकाचे हजारो पानांचे आरोपपत्र आज सकाळी लखीमपूर खेरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पोहोचले.

लखीमपूरच्या तुकानिया येथे ३ ऑक्टोबर रोजी एका पत्रकारासह ८ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेश एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रासह १३ जण न्यायालयीन कोठडीत आहेत. आशिष मिश्राच्या जामीन अर्जावर ६ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

हिंसाचार प्रकरणात शेतकऱ्यांचे वकील अमन म्हणाले की, एफआयआरमध्ये कलम २०१ वाढवण्यात आले आहे. तसेच वीरेंद्र कुमार शुक्ला यांचे नाव जोडले गेले आहे. मंत्र्याचे नावही जोडण्याची विनंती केली होती, मात्र त्यांचे नाव जोडले गेले नाही. दरम्यान, एसआयटीच्या इन्स्पेक्टर विद्या राम दिवाकर यांनी हा अपघात नसून सुनियोजित कट असल्याचे म्हटले होते.

गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि सहकारी नंदन सिंगवर कलम १७७ (मोटार वाहन कायदा) आणि ५/२५ (आर्म्स अ‍ॅक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आरोपपत्र आरोपींना दाखवण्यात आलेले नाही. कोर्टाने आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर कलम ३०९ अन्वये सर्व आरोपींना कोर्टात बोलावून आरोपपत्राची प्रत दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button