मुंबई : गेले तीन आठवडे ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या टार्गेटवर एसीबीचे संचालक समीर वानखेडे होते. पण आता वानखेडेंबरोबर मलिकांच्या ट्रिगर पॉईंटवर भाजप देखील आहे. आर्यन खान ड्रग्ज केसला केपी गोसावीच्या फरार होण्याने एक वेगळं वळण मिळालं. आता त्याच केपी गोसावी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्याच्या बायकोची एका खासगी कंपनीत पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. तसंच येत्या विधानसभा अधिवेशनात तो नेता कोण?, हे नावंही जाहीर करेन, असं म्हणत मलिकांनी फटाक्यांची माळ सुरुच ठेवली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी तुफान बॅटिंग केलीय. दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून ते नवा पॉइंट शोधून काढून वानखेडे, गोसावी यांच्यावर कडाडून हल्ले चढवतायत. कालपर्यंत एनसीबी, वानखेडे यांच्या कारवाईवर शंका उपस्थित करणाऱ्या मलिकांनी आता नवा आरोप करुन बॉम्ब फोडलाय.
येत्या ७ डिसेंबर रोजी नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यावेळी माझ्यावर हल्ले केले जातील. माझ्या जावयाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण आता मी काही बोलणार नाही. मला विषयांतर करायचे नाही. हे जे काही आहे. त्याचा पोपट केल्यानंतर बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. हिवाळी अधिवेशनात अनेक मोठी नावे उघड होणार आहेत, असं मलिक यांनी सांगितलं. तसंच भाजपच्या कोणत्या नेत्याचे बायकोचे केपी गोसावीच्या कंपनीसोबत पार्टनरशीप आहे, हे मी अधिवेशनार सांगणार असल्याचा ब़ॉम्ब मलिकांनी फोडला.
पिक्चरचा शेवट जो बोगस आणि फर्जी माणूस आहे त्याची नोकरी जाणे, त्याला तुरुंगात टाकणे, हे यंत्रणेच्या माध्यमातून नाही. बोगस सर्टिफिकेटच्या आधारे बोलतोय. पिक्चरचा शेवट केव्हा होईल जेव्हा निरपराध लोक तुरुंगातून बाहेर येत नाही आणि या सर्व केसेसे कशा फेक आहेत हे जोपर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत या पिक्चरचा शोध होणार नाही, असं ते म्हणाले.
पोपटाला वाचवण्यासाठी सर्व लोक पुढे पुढे पळत आहेत. पण विधानसभेत सर्व परिस्थिती समोर आल्यानंतर यांना महाराष्ट्राला तोंड दाखवता येणार नाही, तसे माझे प्रयत्न सुरू आहेत, असं सांगून त्यांनी भाजपला सूचक इशारा दिला.
काशिफ खानकडे किती लोकांचे पैसे आहेत. त्याच्या माध्यमातून काय काय होते… काशिफ खानची कसून चौकशी झाली तर बरंचसं काय यातून उघड होणार आहे. काही हत्यार माझ्याकडे राहू द्या. विधानसभा अधिवेशन वादळी ठरणार आहे. आता बोललो तर काही लोक कोर्ट कचेऱ्यात जातील. त्यामुळेच विधानसभेत मी काही गोष्टी मांडणार आहे. तेव्हा या लोकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं मलिक म्हणाले.
भाजपचे नेते समीर वानखेडेला भेटायला जातात, राक्षसी विचारांचे हे लोक घाबरले !
जो जीन आहे (भूत) त्याचा जीव एका पोपटात होता, तो हाच पोपट तुरुंगात जाणार असल्याने जे राक्षसी विचाराचे भाजपचे लोक आहेत ते घाबरले आहेत, असे म्हणत मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय. आपलं प्रकरण बाहेर येवू नये यासाठी भाजपवाले धडपड करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला.
महाराष्ट्रातील जनतेला व महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान समीर वानखेडे याच्या माध्यमातून होत आहे हे पहिल्या दिवसापासून बोलत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. हे कटकारस्थान भाजपकडून सुरू आहे. मी आज नाव घेत नाही परंतु भाजपचे मोठमोठे नेते एनसीबीच्या कार्यालयात समीर वानखेडेला भेटायला जात आहेत. भाजपचे काही नेते त्यांचे राईटहँड समीर वानखेडेला भेटत आहेत हे जबाबदारीने सांगत असल्याचे सांगताना कालपासून या हालचाली वाढल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
राज्यातील सरकारला, मुंबईला, बॉलिवूडला बदनाम करुन योगी महाराज नोएडामध्ये एक बॉलिवूड निर्माण करत आहेत. त्यांना वाटतंय की बॉलीवूडला बदनाम केले की बॉलिवूड बाहेर जाईल. परंतु त्यांना माहीत नाही बॉलिवूड बनवण्यासाठी दादासाहेब फाळके, व्ही शांताराम व काही मराठी कलाकार व दिग्दर्शकांनी ओळख दिली आहे. बॉलिवूड देशाची संस्कृती व ओळख संपूर्ण जगात घेऊन जात आहे. बॉलिवूडच्या गाण्यातून लोक भारतदर्शन करतात. बॉलिवूडच्या माध्यमातून राज्यात, मुंबईत लाखो लोकांचा रोजगार चालतो. बॉलिवूडला बदनाम करुन योगी महाराज जर ‘युपीवूड’ करण्याचा विचार करत असतील तर त्यांचे स्वप्न स्वप्नच राहील, असेही मलिक यांनी म्हटले.
माझी लढाई कुणाच्या कुटुंबाविरोधात नाही, ती अन्यायाविरोधात आहे !
आता परिस्थिती संपूर्णत: बदलली आहे. पिक्चर अभी बाकी है, संपूर्ण सिक्वेन्सच आता बदलला आहे. धरपकड करणारे लोकं आता बचावाचा मार्ग शोधत आहेत, म्हणूनच मी काल पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं म्हटलं, असं नवाब मलिक म्हणाले. जी व्यक्ती आर्यन खानला तुरूंगात घेऊन जात होती ती आज तुरुंगात आहे. २ तारखेनंतर परिस्थिती बदलली आहे. जी व्यक्ती आर्यन खानला जामीन मिळू नये म्हणून शक्ती पणाला लावत होती, ती काल कोर्टात दाद मागत होती. पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे. ती सीबीआयकडे किंवा एनसीबीकडे वर्ग करण्याची मागणी ते करत होते, असंही ते म्हणाले.
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत निरपराध व्यक्तीला तुरूंगात डांबणं चुकीचं आहे. काल तीन लोकांना जामीन मिळाला. वानखेडे हे एनसीबीत आल्यानंतर अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरूंगात डांबलं. एका महिन्याच्या आत अनेक गोष्टी बदलत आहेत, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. वानखेडे यांनी सर्व पर्यायांचा वापर केला. माझ्या कुटुंबाला याच्या मध्ये आणण्यात येत असल्याचे ते यापूर्वी म्हणाले. त्यांनी मी त्यांच्या आईचं नाव या प्रकरणात घेतल्याचं म्हटलं. परंतु मी त्यांचं नाव कधीही यात घेतलं नाही. मी त्यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो ट्विटरवर टाकला परंतु त्यांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल काहीच बोललो नाही. माझी लढाई कोणाच्या कुटुंबीयांविरोधात नाही, तर अन्यायाविरोधात आहे, असंही मलिक म्हणाले.