कोर्लईपाठोपाठ अलिबागवरून किरीट सोमय्या तोंडघशी !
अलिबाग : भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात गेल्या काही काळापासून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पुण्यात सोमय्या यांनी जंबो कोविड सेंटर घोटाळ्यात मध्ये राऊतांचा सहभाग असल्याचे आरोप केल्याने आणि ईडी कारवाईवरून राज्यातील राजकीय वातावरण पेटले आहे. राऊतांनी सोमय्या यांना दलाल आणि अन्य शब्द संबोधत सोमय्या पिता-पुत्र जेलमध्ये जाणार असल्याचे भाकित केले आहे.
संजय राऊतांनी अलिबाग येथे जमीन मालकावर दबाव टाकून जमीन घेतल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. यावर आता हा जमिन मालक समोर आला आहे. मात्र या आरोपावर एका पत्रकाराने थेट मूळ मालकाशी संवाद साधला. होय मीच संजय राऊत याना जमीन विकली मात्र आमच्यावर कोणताही दबाव नव्हता, खेळीमेळीच्या वातावरणात हा व्यवहार झाला आहे. आमचे घरगुती संबंध देखील चांगले असल्याने हा संपूर्ण व्यवहार झाला, असे हे मूळ जमिन मालक चंद्रकांत भिडे म्हणाले. १९९७ साली ६० ते ७० हजारात १ एकर जमीन विकली आणि हा व्यवहार पूर्ण पणे पारदर्शक असल्याचे देखील भिडे यांनी सांगितले.
किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावामध्ये रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले बेकायदेशीर पणे बांधल्याचा आरोप केला होता. प्रत्यक्षात तिथे एकही पक्के घर बांधलेले नाही, हे समोर आले आहे. तिथे काही वर्षांपूर्वी कच्च्या झोपड्या बांधल्या होत्या. त्यांची नोंद तेथील ग्रा. पंचायतकडे होती. संशयित रित्या मृत्यू झालेले आर्किटेक्ट अन्वय नाईक यांना तिथे रिसॉर्ट बांधायचे होते. परंतू तिथे निर्बंध असल्याने ती जमिन ठाकरेंनी विकत घेतली होती. ग्राम पंचायतने ठाकरेंना कर भरण्यास सांगितले होते, त्यानुसार ठाकरेंनी कर भरला होता. आता तिथे काहीच नसल्याने ग्रामपंचायतने करातून ही प्रॉपर्टी वगळली आहे.
राऊतांनी दोन सिनेमे काढलेत, मनोरंजन हा त्यांचा विषय; सोमय्यांचा पलटवार
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सरकारला द्यावेत. केवळ टेलिव्हिजन वाहिन्यांसमोर आरोप करू नयेत, असं म्हणतानाच राऊत यांनी दोन सिनेमे काढले आहेत. त्यामुळे मनोरंजन हा त्यांचा विषय असल्याचं विधान करत किरीट सोमय्यांनी आज सकाळी पलटलवार केला. मी कोणतेही आरोप करताना त्याचे सबळ पुरावे देतो. वृत्त वाहिन्यांनीही एखादा व्यक्ती आरोप करत असेल तर त्याचे पुरावे संबंधित व्यक्तीकडे आहेत का याची पडताळणी करुन घ्यायला हवी. त्यानंतरच बातम्या दाखवाव्यात. कारण राऊतांकडून माध्यमांचा गैरवापर केला जात आहे. त्यांच्याकडे जर माझ्या किंवा माझ्या मुलाविरोधात पुरावे असतील तर ते कोर्टात द्यावेत. सरकार त्यांचंच आहे, असं आव्हान किरीट सोमय्या यांनी राऊतांना दिलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या नावावरचे १९ बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये पत्रं लिहून माझ्या नावावर बंगले करा असं सांगितलं होतं. मी या बंगल्यांबाबत काहीच बोललो नाही. पण संजय राऊतांनीच हा विषय उकरू काढला आहे. बंगल्यांबाबत ठाकरे कुटुंबीयांनी बोलावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर या बंगल्याबाबत का बोलत नाहीत? संजय राऊतच या बंगल्याबाबत का बोलत आहेत? असा सवाल उपस्थित करत किरीट सोमय्यांनी निशाणा साधला.
जानेवारी २०१९ मध्ये माझ्या नावानं बंगले करा, असं रश्मी ठाकरेंचं पत्र आहे. मी बंगले दाखवणार नाही. तुम्हीच कागदपत्रांच्या आधारे त्या ठिकाणी बंगले असल्याचं सिद्ध केलं आहे. मी जाऊन तिथे बंगले शोधले. पण मला बंगले सापडले नाहीत. आता मुख्यमंत्र्यांचे १९ बंगले हरवलेत, यावर रश्मी ठाकरे, वायकर हे सगळे बोलतील. राऊत का बोलत आहेत?, असा सवाल त्यांनी केला. उद्या अलिबागला जाणार, बंगले नसतील, तर पोलिस स्थानकात तक्रार करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भातील एक ट्विट देखील किरीट सोमय्यांनी केलं आहे.