Top Newsराजकारण

आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीकडून तरुणांना लाखोंचा गंडा

पालघर: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीबद्दल आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. किरण गोसावी याच्या विरुद्ध पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार असल्याच उघडकीस आलं होतं. आता पालघर जिल्ह्यातील दोघांची परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. पालघरच्या दोन तरुणांनी किरण गोसावीविरोधात तक्रार दिली आहे. आर्यन खान प्रकरणामधील एनसीबीने ज्याला पंच केलाय,तोच पंच किरण गोसावी फसवणुकीचं रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक आरोप पालघरमधील पीडित तरुणांनी केला आहे.

आर्यन खानच्या प्रकरणांमध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. याच किरण गोसावी यानं अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात कामाला लावतो असे सांगून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांची ही त्याने दोन वर्ष आधी फसवणूक केली होती. उत्कर्ष तरे व आदर्श किणी या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.

नवी मुंबई येथील कार्यालयातून तो हे चुकीचे धंदे फसवणुकीची रॅकेट चालवत होता. फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष व आदर्श याला मलेशियाला कामाला लावतो असे सांगितल्यानंतर दोघांनीही गोसावी याला बँक खात्यात पैसे दिले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट व व्हिसा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट व व्हिसा बोगस असल्याचे कळाल्यानंतर या दोघांनाही शॉक बसला. येथून ते पालघर येथे आले व पालघर येथे आल्यानंतर आपली फसवणूक झालेल्या प्रकरणी त्यांनी केळवा पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.

केळवा पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही म्हणून दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर दोन वर्षे उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे उत्कर्ष याने सांगितले आहे. माझ्यासारख्या अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता असल्याचे उत्कर्ष याने सांगितले. आमच्या फसवणूक प्रकरणामध्ये किरण गोसावी याला पोलिसांनी पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button