राजकारण

फडणवीसांची बाजू सावरण्यासाठी केशव उपाध्ये आणि आशिष शेलार सरसावले !

फडणवीसांशी संबंध जोडलेला रियाज भाटी राष्ट्रवादीचाच; भाजपचा दावा

मुंबई : कोणतेही आरोप झाल्यानंतर फडणवीस मीडियासमोर येऊन प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. दिवाळीपूर्वी मलिक यांनी ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात अटक झालेल्या जयदीप राणाचे फडणवीसांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी काही तासात मीडियासमोर येऊन मलिक यांना प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, आज मलिक यांनी आरोपांची माळ लावल्यानंतर फडणवीसांनी केवळ ट्विट करून त्यांना उत्तर दिलं. तेही एका सुविचाराचा आधार घेत फडणवीसांनी उत्तर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र फडणवीसांची बाजू सावरण्यासाठी पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि आ. आशिष सरसावले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असं म्हणत मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागलं. यावर बोलताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करत नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलंय. ‘मी राष्ट्रवादीचाच – रियाज भाटी. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती. तेव्हापासून रियाज भाटी राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जनरल सचिव म्हणून ते काम करत होता. पाहा काय म्हणतोय रियाज भाटी, अशा आशयाचं ट्वीट करत त्यांनी एक व्हिडीओही ट्विट केला आहे.

गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा; शेलारांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळले

हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे सकाळी १० वाजता लवंगीही लावू शकले नाहीत. लवंगी लावण्याचा प्रयत्न केला त्यात हात पोळले आणि म्हणून त्यांची हतबलता, घालमेल इतकी होती की, त्यांना हायड्रोजन सोडून ऑक्सिजनची गरज लागेलं, असं वाटलं, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे.

मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाझ भाटी, समीर वानखेडे अशी अनेक नावं घेऊन त्यांनी खूप मोठं चित्र उभं करण्याचा प्रयत्न जरुर त्यांनी केला, पण तो विफळ ठरला. याचा कारण देवेंद्र फडणवीसांशी जोडणं याचा प्रयत्न नवाब मलिकांनी केला, पण त्यात सत्य नाही, असं म्हणत नवाब मलिकांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा आशिष शेलारांनी केलाय. संपूर्ण राज्य सरकारची यंत्रणा तिनही पक्षांनी एकत्र लावूनसुद्धा देवेंद्र फडणवीसांवर चिकटणारा तर सोडाच, पण लागू शकेल असा आरोपही मलिक करु शकले नाहीत, असं आशिष शेलार म्हणाले.

हो हे खरंय. मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफत हे तिघेही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना विविध बोर्डावर अध्यक्ष म्हणून बसवलं होतं. यापैकी हाजी अराफत आणि हाजी हैदर यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांची पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच त्यांच्या कायदेशीरपणे नेमणूका झाल्या होत्या. मुन्ना यादव यांच्यावर एक आरोप आहे, त्याचं स्पष्टीकरण ते स्वतः करतील. मला माहीत असलं तरी यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचं कनेक्शन ते स्वतःच सांगतील. हे सगळं सोडलं तर गेल्या दोन वर्ष तुमचं सरकार आहे. विशेषतः तुमच्या पक्षाच्या नेत्यांकडे गृहमंत्री पद आहे. आज तुम्ही ज्यांच्यावर गंभीर आरोप करताय. त्या हाजी अराफत आणि हाजी हैदर यांच्यावर गेल्या दोन वर्षांत एक साधा अदखलपात्र गुन्हाही नोंद करु शकला नाही. गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा. यात कोणताही गैरप्रकार देवेंद्र फडणवीसांच्या काळात झाला नाही, असं आशिष शेलार म्हणाले.

ज्या पद्धतीनं आरोप केला त्यातलं सत्य हे आहे की, त्या प्रकरणात पकडला गेलेला इमरान आलम शेख हा हाजी अराफतचा भाऊ होता. तो काँग्रेसचा तत्कालीन सचिव होता. जेव्हा त्याच्यावर आरोप झाले, त्याला अटक झाली त्यावेळी तो काँग्रेसचा सचिव होता. आणि आता ज्यावेळी मलिक आरोप करत आहेत, त्यावेळी तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. हाजी हैदर स्वतः पत्रकार परिषदा घेणार आहेत. गेल्या २ वर्षांत बांग्लादेश सोडाच मुंबईतील कोणत्याही भागात त्यांनी कोणता गुन्हा केल्याचीही नोंद नाहीये. त्यामुळे सामान्य माणसांना फसवण्याचा, लटकवण्याचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा धंदा आहे, त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आरोप करण्याचा प्रयत्न मलिकांनी केला.

मलिकांनी रियाझ भाटीचा उल्लेख केला. आम्ही स्पष्ट करतो की, पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधान कार्यक्रम याच्याशी रियाझ भाटी यांचा काहीही संबंध नाही. तसेच फोटोवरुनच संबंध प्रस्तापित करण्याचे असतील. तर आमच्याकडेही काही फोटो होते. मी दाखवणार नव्हतो पण…, असं म्हणत आशिष शेलार यांनी काही फोटो दाखवले.

रियाज भाटीला गायब करण्यामागे राष्ट्रवादीचा हात?

पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान यांच्याशी रियाज भाटीचा संबंध नाही. रियाज भाटीला गायब करण्यामागे राष्ट्रवादीचा हात आहे का? असा सवाल शेलार यांनी विचारला आहे. रियाज भाटीचे सर्वच राजकीय नेत्यांसोबत फोटो आहे. तसेच हा रियाज भाटी १९९९ ला राष्ट्रवादी स्थापनेपासून ते पक्षाचे पदाधिकारी होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ता जनरल सचिव होता असं प्रत्युत्तर शेलार यांनी दिलं. रियाज भाटी गायब झालाय की त्याला वाचवलं जात आहे? राष्ट्रवादी काँग्रेस रियाज भाटीला कस्टडीत आणण्यापासून वाचवत आहे. रियाज भाटीचं नाव सचिन वाझे प्रकरणात आलं आहे. त्यामुळे रियाज भाटी मुंबई पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणांसमोर आला तर वसुलीचे आणखी काही नावं फुटतील याची भीती वाटतेय का? असा गंभीर आरोप शेलारांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button