मुंबईच्या केईएम रुग्णालयात ५ कोटींचा गैरव्यवहार; अकाऊंटटला अटक

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण तडफडत असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी या काळात कोट्यवधींचे गैरव्यवहार होत आहे. मुंबईतील प्रसिद्ध केईएम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या घोटाळ्याप्रकरणी एका अकाऊंटटला पोलिसांनी अटक केली आहे. राजन राऊळ असे या व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी श्रीपाद देसाई या दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.
मुंबईतील परळमधील के.ई.एम. रुग्णालय हे फार प्रसिद्ध आहे. या के.ई.एम. रुग्णालयात अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. कमी खर्चात किंवा माफक दरात या ठिकाणी उपचार मिळत असल्याने अनेक रुग्णही या ठिकाणी गर्दी करतात. मात्र याच के.ई.एम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार समोर आला आहे. याप्रकरणी एका अकाऊंटटला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे.
केईएममध्ये झालेला हा घोटाळा तब्बल ५ कोटी २३ लाख ९६ रुपयांचा आहे. यात दोन आरोपींचा समावेश आहे. हे आरोपी संस्थेतील माजी अधिष्ठातांची बनावट स्वाक्षरी करायचे. त्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या खात्यातून हे पैसे स्वत:च्या मालकीच्या नावे असलेल्या कंपनीच्या नावे वर्ग करायचे. फक्त कंपनीतच नाही तर इतर खात्यांमध्येही त्यांनी हे पैसे वळवल्याचे तपासात समोर आले आहे. सेठ गोवरधन सुंदरदस मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयाच्या अकाऊंटमध्ये हा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी केईएमचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी तक्रार केली होती. या घोटाळ्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राजन राऊळ असे या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी श्रीपाद देसाई या दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.