राजकारण

अन्यथा आणखी वाईट परिस्थिती होईल; कपिल सिब्बलांचा काँग्रेस नेतृत्वाला इशारा

नवी दिल्ली : पुढील काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असून, भाजपने आतापासूनच यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये इनकमिंगला सुरुवात झाली असून, जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून राजकारण तापण्यास सुरुवात झाली असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा अहेर देत आणखी वाईट परिस्थिती ओढवू शकेल, असा सूचक इशारा दिला आहे.

जितीन प्रसाद यांच्या कृतीवर माझा आक्षेप आहे. मात्र, त्यांनी जे केले, त्याविरोधात मी नाही. त्यांच्याकडे त्यासाठी योग्य कारण असू शकेल. पण भाजपमध्ये प्रवेश करणे हे मी समजू शकत नाही. आपण आयाराम गयाराम राजकारणापासून आता ‘प्रसादा’च्या राजकारणाकडे वळू लागल्याचे हे प्रतिक आहे. माझ्या जन्मापासून मी भाजपाला विरोध करत आलो आहे. त्यामुळे जिवंतपणी मी भाजपामध्ये जाणार नाही, असे सिब्बल यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

मला खात्री आहे की, नेमकी समस्या काय आहेत, याची नेतृत्वाला माहिती आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे आहे की, नेतृत्व लोकांचे ऐकेल. कारण ऐकल्याशिवाय काहीही तग धरू शकत नाही. पक्षांतर्गत समस्यांचे निराकरण केले गेले नाही हे खरे आहे. या समस्यांची शक्य तितक्या लवकर दखल घेतली गेली पाहिजे, या शब्दांत कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वाचे अप्रत्यक्षरित्या कान टोचले आहेत.

काँग्रेसने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मोठा पक्ष व्हायला हवे. त्यासाठी पुनर्रचना करणे गरजेचे आहे. पक्षप्रमुखाने ऐकलेच नाही किंवा ऐकणे सोडून दिले, तर संघटना कोसळेल. पक्षाने आमचे ऐकावे, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे सांगत तुम्ही जर ऐकले नाहीत, तर तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढवेल, असा सूचक इशाराही सिब्बल यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button