
अकोला/ठाणे : महात्मा गांधींविरोधातील वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. महात्मा गांधींविरोधात वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाचा अटकपूर्व जामीन अर्ज अकोला जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
रायपूर येथे रविवारी झालेल्या धर्मसभेत कालीचरण महाराजाने आपल्या भाषणात महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याचे पडसाद देशभरात उमटत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रातून या वक्तव्याचा निषेध नोंदविला जात आहे. कालीचरणला अटक व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. दरम्यान, काल अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने कालीचरण महाराजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
छत्तीसगडमधील रायपूर येथे धर्म संसदेत कालीचरण महाराजाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. फिर्यादी काँग्रेस नेते प्रशांत गावंडे यांच्या तक्रारीवरून अकोल्यात कालीचरण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर कालीचरण महाराजाने कोर्टात धाव घेवून, अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. काल (या अर्जावर अकोला न्यायालय येथे सुनावणी झाली. न्या. शर्मा यांच्यासमोर दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. गावंडे यांची बाजू अॅड. नजीब शेख यांनी मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने कालीचरण याचा अटक पूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
‘कालीचरण महाराज’ अकोल्यातील जुने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये ‘भावसार पंचबंगला’ भागात राहतो. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजाची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत. त्यांच मुळ नाव ‘अभिजीत धनंजय सराग’. शिवाजीनगर भागातील धनंजय आणि सुमित्रा सराग या दांपत्याच्या पोटी कालीचरण महाराज याचा जन्म झाला. लहानपणी अभिजीत अत्यंत खोडकर होता. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. घरच्यांना तो शिकावा, काहीतरी वेगळं काम करावं असं वाटायचं. मात्र, या परिस्थितीतही त्याचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा ‘कालीपुत्र कालीचरण’ झाला. पुढे लोकांनी त्याला ‘महाराज’ संबोधनं सुरू केलं. मात्र, ‘कालीचरण महाराज’ स्वत: आपण महाराज नव्हे तर ‘कालीमाते’चा भक्त आणि पुत्र असल्याचं सांगतो
कालीचरण महाराजाचं मूळ नाव अभिजीत धनंजय सराग आहे. तो आठवीपर्यंत शिकला आहे. अध्यात्माकडील ओढ्यामुळे शिक्षण सोडलं. हरिद्वारला जात दिक्षा घेतली. कालिभक्त म्हणून कालिचरण महाराज नाव धारण केलं. दोन वर्षांपूर्वी शिवतांडव स्तोत्र व्हिडीओमूळे देशभरात लोकप्रिय झाला. कट्टर हिंदूत्ववादाचे तो पुरस्कर्ता आहे. २०१७ मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत तो पराभूत झाला आहे.
कालीचरण बाबाविरोधात जितेंद्र आव्हाडांची ठाणे पोलिसात तक्रार
छत्तीसगडमधील धर्मसंसदेत कालीचरण बाबानं महात्मा गांधींबाबत संतापजनक वक्तव्य करून नवा वाद निर्माण केलाय. महात्मा गांधींबाबत अपशब्दांचा वापर करतानाच कालीचरणनं नथुराम गोडसेंना नमन केलंय. त्यावरून जितेंद्र आव्हाड संतप्त झाले आहेत. बाबाविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच कालीचरण बाबानं आणखी एक व्हिडीओ शेअर करत फासावर द्या मात्र माफी मागणार नाही असं म्हणत वादाला आणखी फोडणी दिली. कालीचरण बाबाच्या संतापजनक वक्तव्याचे पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही उमटेल. मविआ नेत्यांनी कालीचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरून मंत्री जितेंद्र आव्हाडही पोलिसात गेले आहेत.
कालीचरण बाबाच्या संतापजनक विधानावरून काँग्रेस आक्रमक झाली असतानाच राष्ट्रवादी नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील नौपाडा पोलिसात या बाबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. फॅसिजनविरुद्ध मैदानात उतरूनच लढावे लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. मी स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता कालीचरण बाबा विरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंदवायला चाललो आहे. ही विचारांची लढाई आहे. असे ट्विटही मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ही टीका करून कालिचरण याने सबंध देशवासियांचा अवमान केला आहे. त्याबद्दल जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धडक दिली. तसेच कालिचरण बाबाविरोधात फिर्याद दाखल केली.




