काबुल : अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी काबुल विमानतळावर झालेल्या दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी नागरिकांवर केलेल्या हल्ल्यात १३ अमेरिकन सैनिकांसह ७२ लोकांचा मृत्यू झालाय. ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. याशिवाय अनेक नागरिक गंभीर जखमी झालेत. एका अफगाण अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जवळपास १४३ लोक जखमी झालेत. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आणखी एक बॉम्बस्फोट झाला आहे.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या बाहेर इसिसकडून हल्ला करण्यात आला. यात १८ अमेरिकन सैनिक जखमी झालेत. दुसरीकडे इसिस-के या दहशतवादी समहुाने टेलीग्राम अकाउंटवर काबुल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतलीय. अफगाणिस्तानवर काही दिवसांपूर्वीच तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या दुतावासातून या संदर्भातील अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच फ्रान्स दुतावासातून देखील अलर्ट जारी करण्यात आला होता. तरीदेखील अखेर ज्याची भीती होती ती घटना आज घडली. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर काही तासांच्या अंतरावर दोन बॉम्बस्फोट झाले.
काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य गेटवर ही घटना घडली. घटनेनंतर विमानतळ आणि आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांची प्रचंड धावपळ सुरु आहे. विशेष म्हणजे घटनेच्या काही वेळापूर्वीच विमानतळावरुन उड्डाण घेतलेल्या इराणच्या एका लष्करी विमानावर गोळीबार करण्यात आला होता. पण सुदैवाने विमानातील कुणालाही नुकसान पोहोचलं नव्हतं. दुसरीकडे हल्ल्यानंतर आता स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
बायडेन यांचा इशारा
अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या काबुल विमानतळावर एका मागोमाग एक असे तीन बॉम्बस्फोट झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आम्ही दहशतवाद्यांना सोडणार नाही, शोधून त्याची शिक्षा त्यांना देऊ, असा इशारा दिला आहे. बायडेन म्हणाले, आम्ही माफ करणार नाही, विसरणार नाही. आम्ही तुम्हाला शोधून मारू आणि शिक्षा देऊ. आम्ही अफगाणिस्तानातील अमेरिकी सैनिकांना वाचविणार आहोत. तसेच अफगाण सहकाऱ्यांना बाहेर काढी. आमचे मिशन सुरुच राहील. काबुल विमानतळावर झालेल्या या हल्ल्यात अद्याप तालिबान आणि आयएसआयएस दरम्यान काही संबंध आढळलेला नाही.
बायडेन यांनी तीनवेळा हल्ल्याचा संशय व्यक्त केलेला
काबुल विमानतळावर आयएसआयएस हल्ला करण्याची शक्यता बायडेन यांनी तीनवेळा व्यक्त केली होती. २० ऑगस्टला त्यांनी विमानतळावर किंवा त्याच्या आजुबाजुला असलेल्या कोणत्याही दहशतवादी संकटावर नजर ठेवून आहेत. यामध्ये अफगाणिस्तानच्या आयएसआयएसचे दहशतवादी आहेत, जे जेल तोडल्यानंतर बाहेर पडले आहेत, असे म्हटले होते.