ठाणे/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटले आहे. आव्हाड यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात आरक्षणाबाबत बोलत असताना ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला आहे. ओबीसींवर माझा विश्वासच नाही. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात नव्हते. लढायला फक्त महार आणि दलित समाज होता, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं आहे. दरम्यान, आव्हाडांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते आ. चंद्रशेखर बावळकुठे आक्रमक झाले आहेत. आव्हाड यांनी केलेल्या विधानाबाबत ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी देखील बावनकुळे यांनी केली आहे.
ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानं विरोधक आता आक्रमक झाले आहेत. खरं तर ओबीसींवर माझा फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला फक्त महार आणि दलित समाज होता. कारण ओबीसींना लढायचं नव्हतं. ओबीसींवर ब्राह्मणवादाचा पगडा इतका आहे की आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहित नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येत देत नसतं. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येत आहेत. नुसतं घरात बसून व्हॉट्सअॅप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे. केंद्र सरकारशी दोन हात करावे लागणार आहेत, असं आव्हाड म्हणाले.
बावनकुळे यांची मागणी
जितेंद्र आव्हाड हे नेहमीच धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रात सगळ्या समाजात एकवाक्यता आहे. अशात ओबीसींना ज्या प्रकारे हिणवलं गेलं, ओबीसी समाज त्यांना माफ करणार नाही. आव्हाडांनी असं वक्तव्य केल्यानं त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. या मागचा बोलविता धनी कोण हे पाहावं लागेल. त्यांच्यासारख्या कल्पित लोकांमुळेच आरक्षण गेलं. मी त्यांचा निषेध करतो. त्यांनी अजून डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी आव्हाडांना दिलाय.
राजकारण आपली पोळी भाजण्यासाठी ते असं वक्तव्य करतात. शरद पवार यांनी आता सांगितलं पाहिजे की ते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचं समर्थन करतात का? सर्व समाज एकमेकांना साथ देत आहेत, मदत करत आहेत, अशावेळी असं वक्तव्य करुन ते तेढ निर्माण करत आहेत. तसंच आव्हाड यांनी केलेल्या विधानाबाबत ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी देखील बावनकुळे यांनी केली आहे.