मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर गुरुवारी अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. अँजिओग्राफीनंतर अँजिओप्लास्टी करण्याची गरज भासली तर डॉक्टर त्याबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जयंत पाटील उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी राजेश टोपे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील सोबत होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या तपासण्या आणि वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. त्याची माहिती टोपे यांनी दिली. पाटील यांच्या ईसीजी, टू डी इको, रक्तचाचणी आदी तपासण्या करण्यात आल्या आहेत. पहिल्या आणि आताच्या ईसीजीमध्ये फरक दिसून आला आहे. जयंत पाटील हे रक्तदाबाने आधीपासूनच पीडित आहेत. यापूर्वी त्यांची एका वाहिनीत किरकोळ ब्लॉक आढळून आला होता, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
सध्या एक वाहिनीमध्ये ५० टक्के ब्लॉक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी १०-११ वाजता सर्वप्रथम अँजिओग्राफी केली जाईल. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्याची गरज भासली तर डॉक्टर त्याबाबत निर्णय घेतील, असे टोपे म्हणाले. जयंत पाटील सध्या विश्रांती घेत आहेत. ते सर्वांशी बोलत आहेत, संवाद साधत आहेत. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.