महाबळेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदी आणि भाजपवर टोलेबाजी केलीय. ‘नरेंद्र मोदी हे सहजासहजी माघार घेणारे नाहीत. त्यांनी माफी मागितली म्हणजे त्यांचा होमवर्क झालेला होता’, असं जयंत पाटील म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहजासहजी माघार घेणारे नाहीत. त्यांनी माफी मागितली म्हणजे त्यांचा होमवर्क झाला होता. ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने परत कायदे आणणार. त्यामुळे २०२४ मध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी कंबर कसली पाहिजे. २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष करायचा आहे. जे येतील त्यांना येऊ द्या. त्यावर आक्षेप घेऊ नका, कारण संख्यात्मक महत्व असतं, अशी सूचना पाटील यांनी पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलीय.
२४ तास कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. पक्षाचं संघटन वाढवलं पाहिजे. पक्ष संघटनेनं तुम्हाला मान्यता दिली पाहिजे. केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग होत असताना महाराष्ट्र पवार साहेबांच्या पाठिशी उभा राबहिला. शरद पवार यांचा उरलेला विदर्भ दौरा लवकरच होणार आहे. मनाचा भेद करुन भाजपने लोकांच्या मनावर कब्जा मिळवला आहे. भाजप म्हणून नाही तर मोदी म्हणून २०१४ ला भाजपला मतं मिळाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर गाव-खेड्यात काम करत असेल तर आपणही तसंच काम केलं पाहिजे, असं आवाहन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी कायदा मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत क्रिप्टोकरन्सीसह आणखी अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. सरकारने कृषीविषयक तीन कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी जाहीर केले. मात्र, किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) हमीबाबत शेतकरी अजूनही ठाम आहेत आणि आंदोलन मागे घेतलेलं नाही. जोपर्यंत कायदे राज्यासभेत मागे घेतले जाणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच राहील, असं शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.