ईडीची नोटीस येण्यापूर्वीच सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना माहिती कशी मिळते?
जयंत पाटलांचा भाजप नेत्यांना खोचक सवाल

अहमदनगर : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवरील ईडी कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय. ‘किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरुंगात जाईल. व्वा रे बिट्या तुला कुणी सांगितलं? असा सवाल करतानाच ईडीची नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं? याचा अर्थ भाजपतर्फे तपास यंत्रणेचा गैरवापर केला जातोय असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केलाय. हे सगळं महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचलं जात आहे. मंत्र्यांचं नावं घ्या नाहीतर तुमच्यावर कारवाई करू असे सांगून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केलाय.
भाजप चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहत आहे. ही गोष्ट आपल्याला थांबवायची आहे. त्यासाठी आपले संघटन मजबूत करायला हवे असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. एजन्सीचा वापर करून गुंडगिरी सुरू आहे. सुडाचे राजकारण राज्यात नव्हे तर देशातही कधी झालेले नाही. मात्र, भाजपकडून ऐनकेन प्रकारे सुरू आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
निसर्गाची शेतकऱ्यांवर अवकृपा झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात संततधार सुरू आहे. धरणे तुडुंब भरली आहेत. पिकांचं नुकसान झाले आहे. शेतकरीच उरला नाही तर पाणी मिळून फायदा काय? म्हणून या अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण करत, पडेल ती किंमत देऊ पण शेतकऱ्यांना दिलासा देऊ ही महाविकास आघाडीची भूमिका आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
पूर्वी चार आणे वाढले तरी आंदोलन व्हायचे मात्र महागाई दरवाढ होऊनही यावर कोण आंदोलन करत नाही. नरेंद्र मोदी यांनी लोकांना महागाईची एकप्रकारची सवयच लावली आहे. पक्षाच्या माध्यमातून हे विषय लक्षात आणून देण्यासाठी आंदोलन उभे केले पाहिजे. नरेंद्र मोदी आपल्याला मदत करत नाही हे लक्षात आल्यावर सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याचं जयंत पाटील यांनी आवर्जुन सांगितलं.
महाविकास आघाडी कायम राहावी, अशीच राष्ट्रवादीची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग किती सदस्यांचे असावेत, या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील पक्षांनी वेगवेगळी मतं मांडली. त्यावर चर्चा होऊन सरकारचा निर्णय झालाय, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. स्थानिक पातळीवर आघाड्यांचे योग्य ते निर्णय घेऊ. असे निर्णय तेथील परिस्थितीवर अवलंबून असतील. मात्र, ते करतानाही महाविकास आघाडीच्या मूळ संकल्पनेला धरूनच होतील, असं पाहिलं जाईल. महाविकास आघाडी कायम राहावी, अशीच आमची भूमिका आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणून नेमकी भूमिका अद्याप ठरलेली नाही. मात्र, निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. आपापल्या पक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून नेते आपली मतं व्यक्त करीत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी अनेकदा नेत्यांना बोलावं लागतं. मात्र, हे काही अंतिम ठरू शकत नाही. आमची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आघाडी होण्यास प्राधान्य देण्याची भूमिका आहे. तसा आमचा प्रयत्नही राहील, असा दावाही जयंत पाटील यांनी केला.