नवी दिल्ली : गेल्याच महिन्यात एअर इंडिया ही पुन्हा टाटाच्या अधिपत्याखाली आली. ही प्रचंड तोट्यात असलेली कंपनी मोदी सरकारला विकण्यात यश आले आहे. असे असतानाच आता मोदी सरकारने आणखी एक सरकारी एअरलाईन्स कंपनी विकण्याची तयारी सुरु केली आहे. ही एअर इंडियाचीच एक सबसिडरी कंपनी आहे.
अलायन्स एअरची विक्री प्रक्रिया सुरु करण्याची तयारी सुरु झाली आहे. याबाबतचे ईओआय लेटर पुढील आर्थिक वर्षात काढले जाणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्याकडे एअर इंडियाची सबसिडिअरीच्या विक्रीची मंत्रीमंडळाची मंजुरी आधीपासूनच आहे. आम्ही या ग्राऊंड हँडलिंगच्या कंपनीला विकण्यासाठी ईओआय पुढील आर्थिक वर्षात काढू.
सध्या एअर इंडियाच्या चार उपकंपन्या आहेत. एअर इंडिया एअर ट्रांसपोर्ट सर्विसेज , एअरलाइन अलायड सर्विसेज लि. (एएएसएल) म्हणजेच अलायन्स एअर, एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेज लि. (एआयईएसएल) आणि होटल कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. (एचसीआय) या त्या कंपन्या आहेत. कर्जबाजारी एअर इंडियाची नॉन-कोअर मालमत्ता ठेवण्यासाठी २०१९ मध्ये एयर इंडिया एसेट्स होल्डिंग लि. (एआईएएचएल) या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या कंपन्या याच संस्थेकडे आहेत.
एआयएसएएमचे अध्यक्ष गृहमंत्री आहेत. यामध्ये अर्थमंत्री, वाणिज्य मंत्री आणि नागरी विमान वाहतूक मंत्री यांचा समावेश आहे. दुसरीकडे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या निर्गुंतवणुकीसाठी पर्यायी व्यवस्थेमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, अर्थमंत्री आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांचा समावेश आहे.