विरोधकांकडून जाणीवपूर्वक बदनामी; जयंत पाटलांचा आरोप

सांगली : भाजप नेते किरीट सोमय्या यांची राज्य सरकारमधील मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच आहे. सोमय्या यांनी आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलावर १२७ कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यावरुन आता जोरदार राजकारण सुरु झालंय. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. मंत्र्यांवर धादांत खोटे आरोप करणं, मंत्र्यांना टार्गेट करणं ही अतिशय चुकीची पद्धत आहे. किरीट सोमय्या जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. मुश्रीफ या घोटाळ्यात सहभागी असतील असं मला वाटत नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केलाय. ते सांगलीमध्ये बोलत होते.
कुणीही आरोप केले तर त्याची चौकशी होतेच, चौकशी अडवू नये. सांगली मध्यवर्ती बँकेच्या चौकशीत काही निष्पन्न होईल असे मला वाटत नाही. जनसामान्य माणसात त्यांची प्रतिमा चांगली राहते, असंही पाटील म्हणाले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जयंत पाटील यांची सत्ता आहे. पुणे विभागाचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सांगली जिल्हा बँकेचे चौकशीचे आदेश दिले आहेत. शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई होत आहे.