केंद्राचा महाराष्ट्राविषयी द्वेष कायम : जयंत पाटील
अनिल देशमुख पुन्हा मंत्रिमंडळात दिसतील...

मुंबई : लसीच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आमने-सामने उभे ठाकले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीचा तुटवडा असून केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यावर प्रतिक्रिया देत, लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात असून राज्य सरकार विनाकारण राजकारण करत असल्याची टीका केली होती. या सर्वानंतर राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. केंद्र सरकारनं सुरुवातीपासून महाराष्ट्राबरोबर दुजाभाव केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
कोरोनाच्या रुपानं महाराष्ट्र स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेल्या संकटाला सामोरा जात आहे. राज्याचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीनं या संकटाविरोधात लढतंय. पण या संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला पहिल्यापासूनच अगदी मर्यादित सहकार्य केल्याची टीका जयंत पाटलांनी केली. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बिघडावी अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते असंही जयंत पाटील केंद्रावर टीका करताना म्हणाले आहेत.
महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 12.30 कोटी आहे. त्यात अॅक्टिव्ह रुग्ण 4.73 लाखांच्या आसपास आहेत. असं असताना राज्याला आतापर्यंत 85 लाख लसी मिळाल्या. पण दुसरीकडं गुजरातची लोकसंख्या 6.5 कोटी आहे तर त्या ठिकाणी अॅक्टिव्ह रुग्णसंक्या 17 हजार असूनही गुजरातला 80 लाख लसी मिळाल्याचं जयंत पाटील म्हणाले. देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्या, मात्र तसं मुद्दाम होऊ दिलं जात नसल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला आहे.
अनिल देशमुख पुन्हा मंत्रिमंडळात दिसतील…
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडली आहे. अनिल देशमुख यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असून कोर्टाच्या या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, असे जयंत पाटील यांनी नमूद केले. त्याचवेळी पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचे विधान केले आहे. सीबीआयचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर अनिल देशमुख त्यातून निर्दोष मुक्त होतील, याची आम्हाला खात्री आहे. त्यानंतर ते पुन्हा राज्य मंत्रिमंडळात काम करताना जनतेला दिसतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष भक्कमपणे अनिल देशमुख यांच्यामागे उभा असल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.